घरलाईफस्टाईलसेलिब्रेशनच्या नावाखाली मद्यपान करताय...तर सावधान!

सेलिब्रेशनच्या नावाखाली मद्यपान करताय…तर सावधान!

Subscribe

बदलत्या जीवनशैलीबरोबरच सेलिब्रेशनची पध्दतही बदलली आहे. ख्रिसमस असो वा न्यु इयर सेलिब्रेशन प्रत्येक सेलिब्रेशनला मद्याचे सेवन हे सध्याच्या तरुणाईंमध्ये स्टाईल स्टेटमेंट मानले जात आहे. मात्र त्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणामांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. सेलिब्रेशनच्या नावाखाली जागरण करणार्‍या व्यक्तींना मद्यपान, धुम्रपान आणि जंक फूड खाणं यासवयी देखील लागतात आणि हळूहळू या वाईट सवयींमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

सिगारेट ओढणे, ड्रिंक करणे हे तरुणांसाठी आता स्टेट्स सिम्बॉल झाले आहे. एन्जॉयमेंटसाठी, मित्राच्या वाढदिवसाची पार्टी, थर्टीफर्स्ट, नाहीतर मग कॉलेजचा सेन्डॉफ, अशी वेगवेगळी कारणे शोधली जातात. ‘सेलिब्रेशन तो बनता है बॉस’ अशी आजच्या तरुणांची मानसिकता झाली आहे. आपल्याकडे मद्यपानाचा परवाना १८ वर्षे ओलांडल्यानंतर दिला जात असला तरी १२-१४ वर्षांपासून मुले ह्या सगळ्यांचा आनंद लुटतात. दारू पिण्यासाठी, सिगारेट ओढण्यासाठी आजची तरुणाई कारणे शोधू लागली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात आहे. मात्र मद्यपान तसेच धुम्रपानाच्या अतिसेवनामुळे – हृदयाचे विकार, फुफ्फुसाचे आजार, कर्करोग, यकृताचे विकार अशा प्रकारचे अनेक आजारांना बळी पडावे लागत असल्याचे मात्र भान पडत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात दरवर्षी होणार्‍या मृत्यूंपैकी ६ टक्केे मृत्यू दारूमुळे होतात. वास्तविक पाहता अधिक दारू पिण्याचा परिणाम २०० हून अधिक आजारांशी संबंधित आहे. मद्याच्या सतत सेवनामुळे यकृतावर वाईट परिणाम होतो. हळूहळू यकृत आकुंचन पावते. पेशी काम करेनाशा होतात. या स्थितीला लिव्हर सिरोसिर म्हणतात. मद्याच्या अधिक सेवनामुळे मृत्यूही ओढवू शकतो. स्टडीज ऑन अल्कोहोल अ‍ॅण्ड ड्रग्जच्या सर्वेक्षणानुसार कमी वयात दारूचे व्यसन लागल्यास ती सोडल्यावर त्याचे परिणाम दीर्घ वयापर्यंत दिसून येतात. त्यामुळे वय वाढल्यावर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. वेस्टर्न अफेअर्स हेल्थ केअर सिस्टिमच्या संशोधकांच्या मते दारू सेवनाने मेंदूच्या काही भागांवर दुष्परिणाम होतो. दारू सोडली तरी अशा व्यक्तींना समस्या निर्माण होऊ शकतात.

- Advertisement -

दारूच्या अतिसेवनामुळे कोणते दुष्परिणाम होतात ?

1. अति मद्यपानामुळे हेपेटायटिस, यकृत आणि अन्य इंद्रियांमधील र्‍हासकारक बदल असे आजार होऊ शकतात.
2. दारूमुळे पोटाचा अल्सर, जठराला सूज येणे तसेच अनेक पाचक समस्या निर्माण होतात.
3. मद्यपान केल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होतो.
4. महिला मद्यपींना पाळीविषयक समस्या जाणवू शकतात.
5. दारू पिण्याच्या वाईट सवयीमुळे तोंड, यकृत, घसा आणि स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
6. गर्भधारणेच्या दरम्यान मद्यपान केल्याने गर्भपात होण्याची शक्यता असते. तसेच फेटल अल्कोहोल सिंड्रोम (FAS) होऊ शकतो. FAS म्हणजे आईच्या गर्भधारणेतील मद्यपानामुळे मुलांमध्ये दोष निर्माण होऊ शकतो.

हॉलिडे हार्ट सिंड्रोम (एचएचएस)

सुट्ट्यांच्या आनंदाच्या भरात हृदयाला होणारा त्रास फारसा परिचित नाही. त्याला हॉलिडे हार्ट सिंड्रोम (एचएचएस) असं म्हणतात. मद्यपानाचे परिणाम किती गंभीर असतील, हे प्रामुख्याने मद्यपानाचे प्रमाण आणि त्या-त्या व्यक्तीचा वैद्यकीय भूतकाळ यावर अवलंबून आहे. प्रचंड प्रमाणात इन्टॉक्सिकेशन (मद्यपान) झाल्यामुळे उलट्या होणे, शुद्ध हरपणे, स्वादूपिंडाचा दाह होणे, असा त्रास होतो आणि काही वेळा मृत्यूही ओढवू शकतो. अर्थात, वारंवार बेधुंदपणे मद्यपान करण्याने आरोग्याच्या इतर गंभीर तक्रारीही उद्भवू शकतात. अनियंत्रित उच्च रक्तदाब, इस्कॅमिक हृदयरोग किंवा हृदय बंद पडण्याचा त्रास असे त्रास असणार्‍यांसाठी बेधुंद मद्यपान अधिक गंभीर ठरू शकतं. कारण, अतिरिक्त मद्यपानामुळे हे विकार बळावतात. मद्य आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये फारच चटकन आणि परिणामकारकरित्या शोषलं जातं. रक्तातून ते संपूर्ण शरीरात पसरून बहुतांश ऊती व अवयवांपर्यंत पोहोचते.

- Advertisement -

– डॉ. बिपीनचंद्र भामरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -