घरमुंबईविद्यापीठासाठी 20 कोटीला विरोध मात्र उपवनसाठी 22 कोटीचा निधी

विद्यापीठासाठी 20 कोटीला विरोध मात्र उपवनसाठी 22 कोटीचा निधी

Subscribe

प्रस्ताव मंजूर करण्याचा डाव

ठाण्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या दुरुस्तीकरिता आणि इतर खर्चाकरिता निधीची आवश्यकता असताना मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिका आयुक्तांनी 20 कोटी देण्याची घोषणा कशी काय केली असा सवाल करत विद्यापीठाच्या निधीबाबत महापौरांनी विरोध दर्शवला. मात्र आता त्यांच्याच पक्षातील आमदाराने सुमारे 22 कोटींचा निधी उपवन तलावाच्या सुशोभिकरणाकरिता आणि तलावावर फिरता रंगमंच निर्माण करण्याकरीता मागितला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या निधीच्या तरतुदीकरिता डिसेंबर महिन्याच्या येणार्‍या महासभेत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. हा प्रस्ताव नेहमीप्रमाणे प्रचंड गोंधळात आणि आवाजी मतदानाने मंजूर करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याचा त्रास वाचावा व ठाणेकर विद्यार्थ्यांना विद्यापीठ उपकेंद्रात नवनवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास करता यावा, चांगल्या सुविधा उपकेंद्रात मिळाव्यात या उदात्त हेतूने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उपकेंद्रासाठी 20 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

या निधीला ठाणे महापौरांनी विरोध केला होता. आयुक्तांच्या या निर्णयावर महापौर मिनाक्षी शिंदे यांनी तीव्र आक्षेप घेतला. उपकेंद्राला निधी देण्याऐवजी महापालिका शाळांची दुरवस्था सुधारा असा सल्ला महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिला.मात्र आता त्यांच्याच पक्षातील आमदाराने आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त उपवन तलावात तरंगता रंगमंच बांधण्यासाठी आणि उपवन तलाव परिसर सुशोभिकरणासाठी सुमारे 22 कोटींची लेखी मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे. यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि ठामपा प्रशासन नागरिकांच्या कराच्या पैशाची उधळपट्टी करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केला आहे. याबाबत महापौरांनी मौन बाळगले असून ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आयुक्तांनी दिलेल्या निधीला विरोध करणार्‍या महापौरांचा सर्वच स्तरावर निषेध होत आहे.

- Advertisement -

एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता कोटीची उधळपट्टी केलेली महापौरांना चालते, मात्र विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न असलेल्या विद्यापिठाला निधी देण्यास महापौर आक्षेप घेतात. या अगोदरही ठाण्यात बॉलीवूड पार्क, थीम पार्क, सुगंधी झाडे इत्यादी कल्पक तसेच आकर्षक प्रकल्पांच्या नावाखाली भ्रष्टाचार झालेला आहेच, त्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना याची काळजी घेण्यासाठी काय उपाययोजना केली आहे?
-संदीप पाचंगे, मनविसे, ठाणे जिल्हा अध्यक्ष

उपवन तलाव हे प्रोटेक्टेड व्हेटलँडच्या लिस्टमध्ये आहे. यामध्ये उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत की अशा प्रोटेक्टेड व्हॅटलॅडमध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येऊ नये. तलावाच्या मध्यभागी तरंगता स्टेजही करू शकत नाही. मात्र शिवसेनेच्या प्रतापी आमदारांच्या दबावाखाली ठामपा प्रशासन हा ठराव घेऊन आलेले आहे. यामध्ये सर्वांचेच हात ओले होणार आहेत. माझी प्रशासनाला विनंती आहे की सत्ताधार्‍यांच्या या भ्रष्टाचारी प्रस्तावाला प्रशासनाने बळी पडू नये. या ठरावाचा येत्या महासभेत आम्ही जाहीर निषेध करणार आहोत.
– आनंद परांजपे, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे शहर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -