घरलाईफस्टाईलमालमत्ता खरेदीपूर्वी खबरदारी घ्या!

मालमत्ता खरेदीपूर्वी खबरदारी घ्या!

Subscribe

मालमत्ता खरेदी करताना अनेकांना त्यासंबंधी आवश्यक कागदपत्रांविषयी माहिती नसते. त्यामुळे अनेकांची फसगत होते. यात मालमत्ता विकत घेणार्‍यांची अधिक प्रमाणात होत असते. बनावट कागदपत्रे किंवा अपुरी कागदपत्रे यांमुळे मालमत्तेचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही तो कायद्याने पात्र ठरत नाही, परिणामी व्यवहार अपुराच राहतो. म्हणून मालमत्ता खरेदी करताना कोणकोणती कागदपत्रे बाळगणे गरजेचे आहे, याविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे.

घर / सदनिका खरेदी / हस्तांतरण याची साधारणपणे सहा प्रकारांत विभागणी करता येईल.
(१) स्वतंत्र घर, बंगला, इमारत खरेदी
(२) नवीन सदनिका खरेदी
(३) जुनी सदनिका / भाडे तत्त्वावरील खोली – खरेदी / विक्री
(४) नामनिर्देशनपत्राच्या आधारे हस्तांतरण
(५) न्यायालयाचा हुकूमनामा व ताबे पावतीद्वारे हस्तांतरण
(६) वारसाहक्काने / बक्षीसपत्राने होणारे हस्तांतरण. वरीलपैकी कोणत्याही प्रकारे प्राप्त झालेली मिळकत अथवा सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेचे खरेदीखत / हस्तांतरण दस्तऐवज तयार झाल्यावर त्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरून दुय्यम-निबंधकाच्या कार्यालयात रीतसर नोंदणी करून त्याबाबतची पोहोचपावती व सही-शिक्क्यासहित मूळ दस्तऐवज परत आपल्या ताब्यात घेतले की झाले, अशी बहुतेकांची समजूत असते. परंतु, यापुढील महत्त्वाची पूर्तता व निर्वेध मालकीहक्क प्राप्त करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्याबाबतचा सर्व तपशील संबंधित दस्तऐवजाच्या प्रतीसह विहित नमुन्यातील अर्जासोबत आपल्या प्रभागातील महानगरपालिकेच्या कचेरीतील मालमत्ता-कर आकारणी विभागात नोंद करून भोगवटादार दाखला व ग्राहक क्रमांक प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे.

- Advertisement -

यासाठी घर / चाळ मालक व भाडेकरू तसेच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व सभासद यांच्या सहकार्याने महानगरपालिकेकडून भोगवटादार दाखला व ग्राहक क्रमांक मिळण्यासाठी आवश्यक ती पूर्तता करणे गरजेचे आहे. परंतु, अलीकडच्या धकाधकीच्या काळात व नोकरीच्या अनिश्चित वेळेमुळे अशा महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे, महानगरपालिकेच्या दप्तरी (मालमत्ता-कर आकारणी विभागात ) याआधी नोंदविण्यात आलेले भाडेकरू व सभासद यांची नावे वर्षानुवर्षे कायम राहतात, ही वस्तुस्थिती आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व प्रभाग कार्यालयात रुपये २/- चा फॉर्म भरून, अर्ज करून व सोबत ‘ना- हरकत दाखला’ व अन्य दस्तऐवज व संबंधित कागदपत्रांच्या प्रती जोडून भोगवटादार दाखला व ग्राहक क्रमांक प्राप्त करून घेण्याची उपलब्ध पद्धत व माहिती खालीलप्रमाणे :-
(अ) वारसाहक्काने हस्तांतरण झाले असल्यास :
(१) विहित नमुन्यातील अर्ज.
(२) मृत्युदाखला.
(३) तहसीलदार यांचा वारसाबाबतचा दाखला किंवा माननीय न्यायालयाकडून देण्यात आलेला वारसाहक्काचा दाखला.
(४) तहसीलदार यांचा वारसा दाखला सादर केल्यास इतर वारसांनी तक्रार केल्यास महानगरपालिकेने पूर्वीची स्थिती कायम ठेवावी याबाबतचे रुपये ५०/- च्या स्टॅम्प पेपरवर सत्यप्रतिज्ञापत्र दाखल करावे लागेल.
(५) मृत्युपत्र केले असल्यास दुय्यम-निबंधक यांच्याकडील मृत्युपत्राची प्रमाणित नक्कल.
(ब) मिळकत खरेदीखताने हस्तांतरण करण्यासाठी:
(१) मिळकत खरेदी करणार्‍याचा विहित नमुन्यातील अर्ज.
(२) विकणार्‍याचा ना-हरकत दाखला.
(३) खरेदीखताची दुय्यम-निबंधकाकडे नोंदविलेली प्रमाणित नक्कल किंवा सूची क्रमांक २ ची खरी प्रत.
(क) बक्षीसपत्राद्वारे मिळालेली मिळकत नोंदविण्यासाठी :
(१) विहित नमुन्यातील अर्ज.
(२) बक्षीसपत्राची दुय्यम-निबंधकाकडे नोंदविलेल्या दस्तऐवजाची प्रमाणित नक्कल.
(ड) सहकारी गृहनिर्माण संस्थेतील अधिकृत सभासदांची ‘भोगवटादार सभासद’ म्हणून नोंद करण्यासाठी व ग्राहक क्रमांक मिळविण्यासाठी :
(१) संस्थेच्या अधिकृत सभासदाचा विहित नमुन्यातील अर्ज.
(२) खरेदीखताची दुय्यम-निबंधक कार्यालयाची प्रमाणित नक्कल किंवा सूची क्रमांक २ ची खरी प्रत.
(३) सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाली असल्यास सदरहू सहकारी गृहनिर्माण संस्थेचा ना-हरकत दाखला आणि संस्थेच्या भागपत्राची (शेअर सर्टिफिकेटची) प्रमाणित नक्कल.
(४) सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाली नसल्यास विकासकाचा ना-हरकत दाखला.
(५) सदनिका विकणार्‍याचा ना-हरकत दाखला.

भोगवटादार दाखल्याचे फायदे :-

आपल्या हयातीत किंवा आपल्या पश्चात मिळकतीसंबंधी / सदनिकेसंबंधी काही वाद किंवा तांत्रिक अडचण उपस्थित झाल्यास भोगवटादार दाखला एक कायदेशीर व विश्वसनीय पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्याचे फायदे खालीलप्रमाणे :-
(१) सभासदाच्या हयातीत किंवा मृत्यूनंतर मिळकतीच्या / सदनिकेच्या मालकीहक्काबाबत काही कारणास्तव वाद निर्माण झाल्यास.
(२) मिळकतीच्या / सदनिकेच्या क्षेत्रफळाबाबत काही वाद निर्माण झाल्यास.
(३) मिळकतीच्या / सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या पुनर्बाधणीच्या वेळी विकासक किंवा संस्थेच्या पदाधिकार्‍यांबरोबर जागेसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास.
(४) मिळकत / सदनिका अन्य व्यक्तीस विकताना / हस्तांतरित करताना.
(५) नामनिर्देशनपत्राच्या आधारे सदनिका नामनिर्देशित व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करताना.
(६) परदेशात जाताना व्हिसा मिळविण्यासाठी स्थावर मालमत्ताधारक असल्याचा अधिकृत पुरावा.
(७) महाराष्ट्र शासनाची शिधापत्रिका मिळविण्यासाठी राहात असलेल्या जागेसंबंधीचा निवासी / रहिवासी असल्याबद्दलचा अधिकृत पुरावा म्हणून उपयोग होतो.
(८) बँकेकडून वा अन्य कर्जपुरवठा करणार्‍या संस्थेकडून कर्ज मिळविण्यासाठी तारण म्हणून मालमत्ता / मिळकत / सदनिका (स्थावर मिळकत असल्याचा) खात्रीशीर व ग्राह्य पुरावा.
(९) आपल्या मालकीहक्काची जुनी इमारत / एखादी जुनी चाळ / सहकारी गृहनिर्माण संस्थेची जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन इमारतीची पुनर्बांधणी करून त्यासाठी नवीन बेचनपत्र / खरेदीखत तयार करून त्याची मा. दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करताना तुम्ही भोगवटादार दाखला सादर केल्यास तुम्हाला मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कामध्ये भरीव सवलत मिळते. त्यामुळे भविष्यातील सर्वात मोठा आर्थिक फायदा तुम्हाला या भोगवटादार दाखल्याने मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -