घरलोकसभा २०१९हुसेन दलवाई यांच्या मध्यस्थीने आघाडीत दिलजमाई

हुसेन दलवाई यांच्या मध्यस्थीने आघाडीत दिलजमाई

Subscribe

ठाण्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून आनंद परांजपे यांचे नाव घोषित झाले. मात्र आघाडीतील मित्रपक्ष आम्हाला योग्य सन्मान देत नाहीत असे कारण पुढे करीत काँग्रेसच्या एका गटाने उघड नाराजी व्यक्त केली. मात्र याचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये म्हणून काँग्रेसच्या वतीने खा.हुसेन दलवाई यांना मध्यस्थी करण्यासाठी समन्वयक म्हणून पाठवण्यात आले. त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसोबत तसेच आघाडीचे उमेदवार आणि इतर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून या वादावर पडदा टाकण्याचे काम केले. आपण इथे समन्वयक म्हणून आलेलो आहोत. त्यामुळे समन्वय साधून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा जिंकणारच, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाण्यातील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकीस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यासह ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे, पक्ष निरीक्षक राजेश शर्मा, मेहुल वोरा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, एआयसीसीच्या सदस्या सुमन अग्रवाल, अल्पसंख्याक सेलचे कोकण अध्यक्ष अनिस कुरेशी, महिलाध्यक्षा शिल्पा सोनोने, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र, काँग्रेस इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्या अनुपस्थितीमुळे गटबाजी संपली नसल्याची कुजबूज सुरू होती.

- Advertisement -

आघाडीमध्ये नाराजीची चर्चा सुरू असली तरी काँग्रेसमध्ये अशी कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. आणि अशी नाराजी असली तरी ती दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये समन्वय साधून मोदींची ही हुकूमशाही आम्ही मोडीत काढणार आहोत. त्यामुळे आपआपसातील हेवेदावे विसरून आपण विजयी कसे होऊ यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. यासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन दलवाई यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -