घरमुंबईअखेर वसई-विरार, मिरा-भायंदरचा पाणीप्रश्न सुटणार

अखेर वसई-विरार, मिरा-भायंदरचा पाणीप्रश्न सुटणार

Subscribe

वसई विरार महापालिका तसेच मिरा भायंदर महापालिका क्षेत्रातील पाण्याचे संकट येत्या वर्षभराच्या कालावधीत संपुष्टात येणार आहे. अनेक अडथळ्यांनंतर सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. दिवसापोटी ४०३ एमएलडी इतके पाणी पुरवणार्‍या योजनेचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल, अशी अपेक्षा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत केली जात आहे.

सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजने अंतर्गत ८८ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून वसई विरार महापालिका तसेच मिरा भायंदर महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अनेक भागातील स्थानिक लोकांकडून विरोध झाला होता, पण एमएमआरडीएने या प्रकल्पातून स्थानिकांचीही पाण्याची गरज भागवली जाणार आहे, अशी समजूत काढल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांनीही या प्रकल्पासाठी स्थानिकांची समजूत काढल्याने प्रकल्पाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी ही पाईपलाईन वन क्षेत्रातून जाणार असल्याने वन विभागाची परवानगीदेखील घेण्यात आली आहे.

- Advertisement -

दुसर्‍या टप्प्यातील परवानगीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर या कामासाठी आणखी वेग येणार आहे. एकाचवेळी ८ ते १० ठिकाणी पाईपलाईनचे काम सुरू आहे. आतापर्यंत १ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून १८५ दशलक्ष लिटर पाणी वसई विरारला तर २१८ लिटर पाणी मिरा भायंदर महापालिकेसाठी उपलब्ध होणार आहे. एमएमआरडीएच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात या कामासाठी ७०४ कोटी रुपये प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी १३३० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.

गुरुत्वाकर्षणाचा वापर
सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजने अंतर्गत ८८ किलोमीटरचे अंतर कापून पाणी आणण्यात येणार आहे. दोन ठिकाणी हे पाणी उंच टेकडीच्या ठिकाणी स्टोरेज टँकच्या माध्यमातून वसई विरार आणि मिरा भायंदर या महापालिकांसाठी पुरवण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी कोणत्याही ठिकाणी विजेचा वापर करण्यात येणार नाही. संपूर्ण गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून चांगल्या दाबाने हा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -