घरलोकसभा २०१९पवारांचे राजकारण युतीसाठी आंदण?

पवारांचे राजकारण युतीसाठी आंदण?

Subscribe

चार महिन्यांपूर्वी अवघ्या देशभर फिरून भाजपविरोधात सर्व छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधून भाजपच्या विरोधात तगडी शक्ती उभी करण्याचा मनसुबा बाळगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पं. बंगाल येथे आयोजित भाजपविरोधी सर्व पक्षांची सभा आयोजित केली होती, त्या सभेलाही आवर्जून हजेरी लावली होती. मात्र, लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून शरद पवारांनी मैदान सोडून दिले काय, अशी शंका यावी, असे चित्र आहे. ज्या उत्साहात पवारांनी महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी करून निवडणुकीची तयारी सुरू केली, त्याच आघाडीचे नुकसान होईल आणि युतीचा फायदा होईल, असा निर्णय सध्या पवार घेऊ लागले आहेत. त्यांचे हे राजकारण युतीसाठी आंदण ठरते आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. नगर, माढामधील राजकारण, काही मतदारसंघात दिलेले कमजोर उमेदवार यावरून या चर्चेला जोर आला आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी यांच्यातच खरा सामना रंगणार आहे. अन्य छोट्या राजकीय पक्षांचा तितका प्रभाव पडणार नाही. मात्र, अशा परिस्थितीत आघाडीतील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पाहता, त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता आहे. बीडमध्ये भाजपच्या विद्यमान खासदार प्रतिम मुंडे यांच्याविरोधात ताकदीने लढू शकतील, असे अमरसिंह पंडित आहेत. मात्र, शरद पवारांनी त्यांना संधी नाकारून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली. ठाण्यातही नेमचे हेच घडले. विद्यमान खासदार राजन विचारे यांच्याविरोधात नवी मुंबईतील बलाढ्य शक्ती असलेले नेते गणेश नाईक हे आव्हान देऊ शकतील. मात्र, त्यांच्या ऐवजी आनंद परांजपे यांना तिकीट देण्यात आली. २०१४ च्या निवडणुकीत आनंद परांजपेंनी कल्याणमधून निवडणूक लढवली होती.

- Advertisement -

माढ्यातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर मोहिते-पाटील घराण्याने उमेदवारीसाठी दावा केला. स्थानिक आमदार आणि पदाधिकार्‍यांनी मोहिते-पाटील घराण्याला उमेदवारी देण्यास विरोध केला. त्यावेळी पवारांनी यात हस्तक्षेप न करता वेळकाढूपणा केला, परिणाम रणजितसिंह मोहिते-पाटलांनी भाजपची वाट धरली. दिंडोरीही त्याच मार्गावर आहे. राष्ट्रवादीमधून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने ए.टी. पवार यांच्या कन्या भारती भाजपच्या वाटेवर आहेत.

अहमदनगरच्या जागेवरून पवारांनीच काँग्रेसची अडचण केली. सुजय विखेंसाठी जागा सोडणे शक्य असतानाही सोडली नाही. अखेर सुजय विखे-पाटीलही भाजपवासी झाले. त्यामुळे आघाडीने हातची एक जागा जवळजवळ गमावल्यात जमा आहे. याशिवाय काही मतदारसंघातील उमेदवारांवरून राष्ट्रवादीमध्ये अद्यापही गोंधळ सुरू आहे. काही जागांच्या अदला-बदलीवरूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील घोळ मिटायला तयार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -