घरमुंबईपगार हवा तर ५०० चे टार्गेट पूर्ण करा

पगार हवा तर ५०० चे टार्गेट पूर्ण करा

Subscribe

स्वच्छता मार्शल वसुलीसाठी  की स्वच्छतेसाठी

स्वच्छता यादीत अग्रक्रम यावा यासाठी ठाणे महापालिकेकडून योजलेल्या अनेक उपायांपैकी स्वच्छता मार्शल हा महत्त्वाचा  उपाय होता. कुठेही थुंकणे आणि कचरा फेकणे याला आळा बसण्यासाठी  नागरिकांकडून दंड वसूल केला जाऊ लागला. हजारो नागरिकांकडून मागील वर्षात कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, या वसुलीचे  टार्गेटच कंत्राटदाराने मार्शलना दिले असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हे मार्शल सर्वसामान्यांकडून जबरदस्तीने वसुली करण्याचे कारस्थान  करीत आहेत. तसा कंत्राटदार कंपनीचा आदेशच असल्याची लेखी तक्रार स्वच्छता बीट मार्शल अभिषेक भोसले यांनी ठामपा आयुक्तांकडे केली आहे. यामुळे ठामपाने नियुक्त केलेले स्वच्छता निरीक्षक हे ठाणे शहर स्वच्छतेसाठी ठेवले आहेत की, जबरदस्तीने वसुलीसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वच्छता मार्शलकरिता सिंग इंटेलिजन्स सेक्युरिटी प्रा.लि. या कंत्राटदाराला स्वच्छता मार्शल पुरवठादार म्हणून ठामपाने नेमणूक केली. 5 जानेवारी 2018 पासून या कंत्राटदाराने ठाण्यात आपले काम सुरू केले. त्याला स्थानिक पोलीस ठाण्याचे संरक्षणही  देण्यात आले. सुरुवातीला काही महिने व्यवस्थितपणे सुरू असलेल्या या कंत्राटदाराने जबरदस्तीने वसुली करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कंत्राटदार प्रमुख देवदत्त चव्हाण यांनी  प्रत्येकी 500 रुपये पावती रोज वसुली करा अन्यथा घरी बसा, असे फर्मानच काढले आहे. त्यामुळे स्वच्छता मार्शल नागरिकांकडून ऐनकेन प्रकारे वसुली करण्याचेच काम करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.  तसेच मार्शल आणि नागरिक यांच्यामध्येही रोजच वाद होताना दिसत आहे. मात्र 500 रुपये  वसुलीच्या फर्मानाची अंमलबजावणी करण्यास नकार देणार्‍या स्वच्छता मार्शल यांना घरी बसविण्यात आले. अभिषेक भोसले या मार्शलला त्याचा फटका बसला असून, त्याने वसुली न केल्याबद्दल त्याला घरी बसवण्यात आले. याबाबत भोसले याने ठामपा आयुक्तांना लेखी पत्र लिहून सदर कंत्राटदार स्वच्छता मार्शलच्या नावाखाली ठाणेकरांची लूट करत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.  500 रुपये वसुलीच्या अट्टाहासापायी महिला मार्शलनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. वेळप्रसंगी वसुलीसाठी पोलीस ठाण्यापर्यंत नेऊन सर्वसामान्य नागरिकांना अपमानित करण्याचे अनेक प्रकारही घडत आहेत. ही बाब खुद्द स्वच्छता मार्शलनेच आयुक्तांकडे लेखी तक्रारीद्वारे निदर्शनास आणली आहे. त्यामुळे ही मार्शल पद्धती स्वच्छतेसाठी आहे की वसुलीसाठी असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.

- Advertisement -

मागील नऊ महिन्यांपासून मी स्वच्छता मार्शल म्हणून काम केले.  अद्यापही सहा महिन्यांचा पगार कंत्राटदाराकडून मिळालेला नाही. पगार हवा असेल तर दिवसाला 500 रुपयाची वसुली करून आणा असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या वसुलीच्या जबरदस्तीमुळे आम्हाला नेहमीच नागरिकांचा  राग सहन करावा लागत आहे. याबाबत मी वरिष्ठांशी बोलले म्हणून मला कामावरूनच काढून टाकण्यात आले आहे. याबाबत मी  ठामपा आयुक्ताकडे तक्रार  केली आहे.              – अभिषेक बबन भोसले, स्वच्छता बीट मार्शल (तक्रारदार)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -