घरमहाराष्ट्र24 तास काम व पुढचे 72 तास आराम..., ठाकरे गटाचे मुख्यमंत्री शिंदेंवर...

24 तास काम व पुढचे 72 तास आराम…, ठाकरे गटाचे मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीकास्त्र

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांची झोप उडाली की, ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साताऱ्यातील त्यांच्या शेतावर आराम करतात. म्हणजे ‘24 तास काम व पुढचे 72 तास आराम’ असे त्यांच्या जीवनाचे गणित दिसते व शिंदे यांच्या आजाराचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फोडले जाते, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने केली आहे.

अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपाची वाट धरल्यावर सगळ्यात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची. आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे व त्यांना जबरदस्तीने इस्पितळात दाखल करू, असे शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर केले. शिंदे हे 24 तास काम करतात म्हणून ते आजारी पडले, पण शिंदे 24 तास काम करतात ते महाराष्ट्रात कोठेच दृष्य स्वरूपात दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर त्यास 24 तास काम करणे असे म्हणता येत नाही, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर कमळावर निवडणूक लढवू; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान

साताऱ्यात आराम करणे हा उपाय नाही
अजित पवार सरकारात घुसल्यावर एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि मन अस्थिर झाले. त्यात अजित पवार हे अधूनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना भेटू लागल्याने या सगळ्यांच्याच लहान मेंदूस त्रास सुरू झाला, पण त्यासाठी दूर साताऱ्यात जाऊन सततच आराम करणे हा उपाय नाही. शिंदे गटाने त्यांच्या नेत्यास तत्काळ मुंबई-ठाण्यातील इस्पितळात दाखल करून उपचार सुरू केले पाहिजेत. शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे साताऱ्यात जाऊन गावठी उपचार, जडीबुटी, जादूटोणा, बुवाबाजीच्या माध्यमातून उपचार करून घेणे योग्य नाही. आरोग्य हीच संपत्ती आहे व त्या संपत्तीचे रक्षण खोक्यांनी होत नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

‘मी पुन्हा येणार’वाल्यांनाही…
मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्मास आलेले नाही. ‘मी पुन्हा येणार’वाल्यांनाही ‘उप’ वगैरे होऊन उपऱ्यांच्या पखाली वाहाव्या लागत आहेत, पण शिंदे यांना वाटते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपणच, पण अजित पवारांमुळे त्यांच्या श्वासनलिकेत अडथळे निर्माण झाले व त्यांना अलीकडे गुदमरल्यासारखे होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नक्की काय त्रास होतोय? त्यांचा आजार किती खोलवर पसरलाय? आजाराचे मूळ काय? याबाबत आरोग्यमंत्र्यांनी विशेष बुलेटिन जारी केले तर बरे होईल, अशी कोपरखळी या अग्रलेखातून लगावली आहे.

हेही वाचा – स्वतःचा बंगला विकून…, शिंदे गटातील आमदाराच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचा टोला

‘त्याचा’ वेळीच बंदोबस्त हवा
शिंदे यांची प्रकृती चिंता करावी अशी आहे, हे आमदार शिरसाटांचे म्हणणे खरे असेल तर, त्यांना लगेच अतिदक्षता विभागात दाखल करून पुढचे उपचार करावे लागतील व त्यांच्या आसपास अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना फिरकू न देण्याची काळजी घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणास सध्या ज्या आजाराने ग्रासले आहे, त्या आजाराचा किडा मुख्यमंत्र्यांच्या शरीरात असून त्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर हा किडा महाराष्ट्राचे समाजमन पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

दिल्लीहून महाराष्ट्रावर हल्ले
चार दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले व त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने गुप्त खलबते झाल्याची गुप्त बातमी फुटल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आजार बळावला. त्यांच्या गटाच्या लोकांनी हा आजार गांभीर्याने घेतला पाहिजे. खरे तर हा रोग महाराष्ट्राला लागला आहे व अशा रोगाचे लवकरात लवकर उच्चाटन होईल तेवढे बरे. अनेक आजारांनी सध्या महाराष्ट्र कृश व जर्जर झाला आहे. त्यात दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ले करीत आहेत. या सगळ्यातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहील, असा विश्वासही ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -