घरताज्या घडामोडीपत्ता न सांगणार्‍या शेतकर्‍याचा खून; चौघांना अटक,

पत्ता न सांगणार्‍या शेतकर्‍याचा खून; चौघांना अटक,

Subscribe

गावातील व्यक्तीचा पत्ता न सांगितल्याच्या किरकोळ कारणातून हरसूलजवळील धोंडेगाव येथील शेतकर्‍याचा चौघांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक शहरातील मखमलाबाद व उमराळे (ता. दिंडोरी) येथील सावकरासह चौघांना अटक केली आहे. मोतीराम वामन बेंडकोळी (५५) असे मृताचे नाव आहे. हिरामाण काशिनाथ धात्रक (४३, धोतर ओहोळ, उमराळे, ता. दिंडोरी), गणेश दत्तात्रय मानकर (४३, मखमलाबाद, नाशिक), रामनाथ बबन शिंदे (३३, आडगाव, हल्ली उमराळे बुद्रुक) व विकास शिवाजी धात्रक (३०, रा. उमराळे ता. दिंडोरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, ११ मे रोजी रात्री हरसूल पोलीस ठाणे हद्दीतील धोंडेगाव (ता. नशिक) येथील शेतकरी मोतीराम वामन बेंडकोळी (५५) यांच्यावर अनोळखी व्यक्तींनी चाकूने वार करून खून केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झला होता. या प्रकरणाचा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने धोंडेगाव शिवारातील संजीवनी हार्ट केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या दृश्यांची पाहणी केली असता त्यामध्ये पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर कार आढळून आली. त्यानुसार कारचा शोध पथकाने सुरू केला. दरम्यान, ती कार उमराळे येथील एका शिवारात उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाला. त्यानुसार पोलिसांनी कारमालक संशयित हिरामण कारभारी धात्रक यास ताब्यात घेत चौकशी केली. त्याने इतर तीन साथीदारांची माहिती देताच त्यांना पोलिसांनी मखमलाबाद परिसरातून अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी शेतकर्‍याचा खून केल्याची कबुली दिली.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह, अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, रविंद्र शिलावट, पोलीस हवालदार हनुमंत महाले, दत्तात्रय साबळे, पुंडलीक राऊत, भगवान निकम, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विशाल आव्हाड यांच्या पथकाने कामगिरी केली.

अशी घडली घटना

११ मे रोजी सावकार गणेश मानकर यांच्याकडून व्याजाने पैसे हवे असल्याने तिघे त्याच्यासोबत कारमधून व्याजाने पैसे दिलेल्या धोंडेगाव शिवारातील बाळासाहेब म्हैसधुणे यांच्याकडे पैसे घेण्यासाठी जात होते. त्यांच्या घराचा पत्ता विचारण्यासाठी त्यांनी धोंडेगाव शिवारातील रस्त्याने जात असलेले मोतीराम वामन बेंडकोळी यांना म्हैसधुणेंचा पत्ता विचारला. त्यांचा पत्ता माहिती नसल्याचे त्यांनी सांगताच त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. त्यानंतर शिवीगाळीपर्यंत प्रकरण गेल्यानंतर संतापलेल्या चौघांनी बेंडकोळी यांच्यावर चाकून वार केले. बेंडकोळी खाली पडताच चौघांनी कारमधून फरार झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -