घरमहाराष्ट्र१७ दिवस भक्तांची भेट घेतल्यानंतर पंढरीचा विठूराया आता करणार आराम

१७ दिवस भक्तांची भेट घेतल्यानंतर पंढरीचा विठूराया आता करणार आराम

Subscribe

पंढरपूर – पांडुरंगाला आजपासून नियमित विश्रांती मिळणार आहे. कार्तिकी यात्रेपासून पांडुरंगाची चोवीस तास दर्शनसेवा सुरू होती. त्यानंतर आज प्रक्षाळ पूजा करून देवाचे सर्व राजोपचार सुरू होणार आहेत.

28 ऑक्टोबरपासून कार्तिकी एकादशीनिमित्त विठूरायाचं २४ तास दर्शन खुल झालं होतं. भाविकांची सतत वर्दळ होती. लाखो भाविकांनी यानिमित्ताने विठूरायाचं दर्शन घेतलं. सलग १७ दिवस भेटीला येणाऱ्या भक्तांसाठी विठूराया उभा होता. थकलेल्या या विठूरायाचा थकवा आणि शिणवटा घालवण्यासाठी प्रक्षाळ पूजा केली जाते. यासाठी विठूरायाच्या चरणाला लिंबू आणि साखर चोळली जाते. यानंतर संपूर्ण मंदिर धुवून काढलं जातं. मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नांदगिरे यांच्या हस्ते विठ्ठलाची तर अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते रुक्मिणीमातेकडे पूजा करण्यात आली. या पूजेत पारंपरिक पद्धतीने ब्रम्ह वृंदांच्या उपस्थितीत मंत्रपठण करीत देवाला गरम पाण्याने रुद्राभिषेक करण्यात आला.

- Advertisement -

रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नान झाल्यावर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह प्राप्त होत असल्याची भावना वारकरी संप्रदायात असते. यानंतर देवाला पारंपरिक मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले. यात  मस्तकी सुवर्ण मुकुट, गळ्यात अनमोल कौस्तुभ मणी, भाळी निळ्या हिऱ्यांचा नाम, दंडाला दंड पेट्या आणि गळ्यात अत्यंत मौल्यवान मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, तीन पदरी सुवर्ण तुळस माळ, मारवाडी पेठ्यांचे हार, मोठा लफ्फा आणि मोत्याचे कंठे घालण्यात आले. कानाला हिरेजडीत मस्य जोड अशा पोशाखात नटलेल्या विठुरायाचे सौंदर्य अतिशय खुलून दिसत होते. रुक्मिणी मातेलाही वाक्या, तोडे, तानवड, मोहरा आणि पुतळ्यांच्या माळा, हायकोल, चिंचपेटी व पुतळ्याची माळ असे पारंपारिक दागिन्यांनी सजविण्यात आले होते.

या पूजेनंतर देवाला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात आला आणि देवाची महाआरती करण्यात आली . कोरोना संकटामुळे विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी देवाच्या जोडीने गेली 17 दिवस अहोरात्र  उभी असलेली जगन्माता रुक्मिणी मातेचीही आज पवमान अभिषेकाने प्रक्षाळ पूजा करण्यात आली. यावेळी रुक्मिणी मातेलाही हिरे मणक्यांच्या पारंपरिक दागिन्याने सजविण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -