घरमहाराष्ट्रतुमसे नाराज नहीं... पर सब हैरान है...; अजित पवार पुन्हा चर्चेत

तुमसे नाराज नहीं… पर सब हैरान है…; अजित पवार पुन्हा चर्चेत

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांची नाराजी दिवसेंदिवस स्पष्ट होत जाते आहे. शनिवारी शिर्डीत झालेल्या मंथन शिबिरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजारी असतानाही उपस्थित राहिले. मात्र, अजित पवार यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे. गेल्या काही दिवसांतील प्रकरणं पाहता अजित पवार खरंच पक्षावर नाराज आहेत असा प्रश्न पुन्हा अधोरेखित होत आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या मंथन शिबिराला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी गैरहजर राहिल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. शुक्रवारी त्यांनी शिबिरात भाषण केले. परंतु ते शनिवारी दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला आले नाहीत. विशेष म्हणजे रुग्णालयातून वेळ काढून, हाताला बॅण्डेज असतानाही शरद पवार या शिबिरासाठी पोहचले, परंतु अजित पवार मात्र या ठिकाणी न दिसल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आजारपणामुळे शरद पवार फक्त चार मिनिटंच बोलले; वळसे पाटलांनीच वाचून दाखवलं भाषण

१२ सप्टेंबर रोजी राजधानी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडले. कार्यक्रम सुरू असतानाच अजित पवार व्यासपीठावरून उठून निघून गेले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना जोर धरला. अजित पवारांना अधिवेशनात बोलू दिले नसल्याच्या रागाने ते तडकाफडकी व्यासपीठ सोडून निघून गेले अशी चर्चा सुरू होती. या कार्यक्रमात जयंत पाटील बोलले, पण अजित पवारांना डावललं गेलं असा कयास लावला जात होता. मात्र, ‘महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील बोलले. त्यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली. तिथे बोलायचं की नाही हे आम्ही ठरवलं नव्हतं. त्यामुळे मी बोललो नाही. त्यामुळे कारण नसताना चुकीच्या बातम्या पसरल्या गेल्या,’ असं अजित पवार यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं होतं. मी वॉशरुमला जाण्यासाठी बाहेर आलो. आता वॉशरुमलाही जाऊ नये का असा सवालही त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून मी राष्ट्रवादीच्या अधिवेशनात बोललो नाही, नाराजीनाट्यावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण

दिल्लीतील कार्यकारिणी अधिवेशनात घडलेल्या प्रसंगावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली असली तरीही ते पक्षावर आणि पक्षीय कार्यकारिणीवर नाराज असल्याच्या चर्चा नेहमीच रंगतात.

महाविकास आघाडी सत्तास्थापनेवेळीही अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदासाठी अडून बसले होते, अशी चर्चा आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत नोव्हेंबर २०१९ ला महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा करार झाला. त्याप्रमाणे पहिल्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवड झाली. परंतु, उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं नव्हतं. दरम्यान, उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात कोल्ड वॉर सुरू झालं होतं. एका महत्त्वाच्या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी बाहेर पडल्याने पत्रकारांसह राजकीय तज्ज्ञमंडळी संभ्रमात होती. ऐन बैठकीतून अजित पवार बाहेर पडल्याने ते नाराज असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा झाली आणि हे नाराजीनाट्य महाराष्ट्राच्या विस्मृतीत गेले.

हेही वाचा -गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवा रे; अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून मनसेच्या गजानन काळेंचे ट्वीट

२०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावली होती. राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. यावेळी शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांनी जबाब नोंदवला होता. या सर्व घडामोडी दरम्यान अजित पवार नॉट रिचेबल होते. त्यामुळे शरद पवारांवरील संपूर्ण फोकस अजित पवारांकडे गेला होता.

अजित पवारांची राजकीय खेळी?

अजित पवारांचे हे नाराजीनाट्य आता राज्यासाठी नवे राहिलेले नाही. दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकरणीच्या अधिवेशनातील नाट्यावर मी वॉशरुमला गेलो होतो असं स्पष्टीकरण दिलं होतं. तर महाविकास आघाडी सत्तास्थापनेच्या वेळी मी बारामतीला गेलो होतो, असं उत्तर अजित पवारांनी दिलं होतं. मात्र, शिर्डीतील मंथन शिबिरात ते गैरहजर का होते याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. त्यामुळे अजित पवारांची ही राजकीय खेळी असल्याचं म्हटलं जातंय.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -