घरमहाराष्ट्रकलम ३७० - शरद पवारांची एक तर अजितदादांची दुसरीच भूमिका!

कलम ३७० – शरद पवारांची एक तर अजितदादांची दुसरीच भूमिका!

Subscribe

भाजपची महाजनादेश यात्रा, आदित्य ठाकरेंची जनाशिर्वाद यात्रा याच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवस्वराज्य यात्रेचं रणशिंग फुंकलं असून पहिल्याच भाषणात अजित पवार यांनी कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर टिप्पणी केली आहे. मात्र, असं करताना त्यांनी थोरल्या पवारांच्या विरोधी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल राज्यसभेत कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘हा निर्णय घेताना स्थानिक नेत्यांना विचारात घेतले पाहिजे होते’, अशी भूमिका मांडली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी मात्र आज पवारांच्या विरोधातली भूमिका मांडली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जुन्नर येथील सभेला संबोधित करत असताना अजित पवार म्हणाले की, ‘३७० कलम काढलं, हा सरकारने चांगला निर्णय घेतला. देशाची आखंडता टिकवण्यासाठी आणि जातीय सलोखा राखण्यासाठी हे गरजेचे होते. मात्र, सरकारने आता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा. संबंध देशवासियांची हीच भावना असल्याने सरकारने तातडीने कारवाई करावी’, अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेशी विसंगत अशी भूमिका अजित पवार यांनी मांडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुन्हा पवारांच्या विरोधी भूमिका?

‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेत असताना यातून वातावरण खराब होऊ देऊ नका’, अशी विनंती देखील अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार हे अनेकवेळा शरद पवार यांच्या विरोधात भूमिका मांडत असल्याचे दिसून आलेले आहे. ईव्हीएमच्या बाबतीतही हा विरोधाभास दिसून आला होता. थोरले पवार ईव्हीएमच्या विरोधात दंड थोपटत असताना अजित पवार यांनी ‘ईव्हीएमला दोष देऊ नका’, असे वक्तव्य केले होते. मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासाठी थोरल्या पवारांनी विरोध केला होता. तरीही अजित पवारांनी पार्थला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केले. परिणामी मावळची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली होती. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका मांडण्याची स्पर्धाच लागली आहे की काय? असं चित्र निर्माण झालं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेतून जितेंद्र आव्हाड वजा!


‘पूर की प्रचार? मुख्यमंत्र्यांना प्रचार महत्त्वाचा’

‘शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होऊन शिवस्वराज्य यात्रा सुरु करण्यात आली’, असल्याचे अजित पवार यांनी यात्रेबद्दल बोलताना सांगितले. तसेच ‘पुण्यातील अनेक भागातील नद्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत. कार्यकर्त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याची भूमिका वठवली पाहिजे’, असंही ते म्हणाले. ‘आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा?’ असा रोखठोक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -