घरमहाराष्ट्रअमोल कोल्हे शिवज्योत घेऊन अनवाणी धावले

अमोल कोल्हे शिवज्योत घेऊन अनवाणी धावले

Subscribe

पुणे-आळंदी मार्गावरून डॉ. अमोल कोल्हे हे प्रचार दौऱ्यासाठी जात असताना त्यांना मार्गावरून काही शिवप्रेमी तरुण शिवज्योत रॅली काढत असल्याचे दिसले. त्यांनी वेळ न दवडता या रॅलीत सहभागी होऊन स्वतःच्या हातात शिवज्योत घेऊन कोल्हे हे अनवाणी पायांनी धावले.

शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादीकाँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे सध्या त्यांच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी होत आहे. पुणे-आळंदी मार्गावरून डॉ. अमोल कोल्हे हे प्रचार दौऱ्यासाठी जात असताना त्यांना मार्गावरून काही शिवप्रेमी तरुण शिवज्योत रॅली काढत असल्याचे दिसले. त्यांनी वेळ न दवडता या रॅलीत सहभागी होऊन स्वतःच्या हातात शिवज्योत घेऊन कोल्हे हे अनवाणी पायांनी धावले. यावेळी सहभागी शिवप्रेमींनी एकच जल्लोष करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अश्या घोषणा दिल्या. यामुळे काही काळ रॅलीतील वातावरण शिवमय झाले होते. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकप्रियता मिळवली आहे. तसेच त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले असून छत्रपती शिवाजी महाराज यांची नाटकांमधून पात्र साकारली आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आहेत.

‘महाराजांच्या तरुण मावळ्यांसोबत दौडल्याने समाधान’

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवज्योत प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘आज सकाळी पुणे-आळंदी मार्गावरून जात असताना शिवप्रेमी तरुणांनी काढलेली शिवज्योत रॅली दिसली आणि माझे पाय आपोआप रॅलीकडे वळले. थोड्या अंतरासाठी मीही रॅलीमध्ये सहभागी झालो. काही पावले महाराजांच्या तरुण मावळ्यांसोबत दौडल्याने समाधान मिळाले. महाराजांचे आपल्यावर असणारे ऋण तर कधी फिटणारे नाहीत. या महाराष्ट्राच्या मातीला महाराजांनी शिकवलेला अभिमान आणि स्वबळावर विश्वास यांवर आधुनिक महाराष्ट्र आजही उभा आहे. माझ्या वतीने मी ज्यांचे विचार, कर्तृत्व आणि मुल्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन करतो.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -