घरमहाराष्ट्रभाजप ‘विरोधकांना’च करते आपलेसे, म्हणूनच विरोधी पक्षनेतेपद बाळासाहेब थोरातांकडे!

भाजप ‘विरोधकांना’च करते आपलेसे, म्हणूनच विरोधी पक्षनेतेपद बाळासाहेब थोरातांकडे!

Subscribe

मुंबई : विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राज्य विधिमंडळातील गणितेच फिरली आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा केली असली तरी ते पद काँग्रेसकडे जाणार आहे. आता त्या पदावर विविध नावांची चर्चा असली तरी तूर्तास बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक ४५आमदार असून सध्या बाळासाहेब थोरात हे सर्वात ज्येष्ठ आमदार असून विधीमंडळ पक्षनेते आहेत.

शिवसेना पक्षात बंडाचा झेंडा फडकावून उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या सरकारने नुकतीच वर्षपूर्ती साजरी केली. त्यानंतर २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थक ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्षही सहभागी झाला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे २०१४ पासून सत्तेवर आलेल्या भाजपने विरोधकांना आपलेसे करून घेण्यास सुरुवात केली. त्यात काँग्रेसचे प्रमुख नेते राधाकृष्ण विखे-पाटील होते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर विरोधी पक्षनेतेपदी राधाकृष्ण विखे-पाटील होते. २०१९च्या निवडणुकीच्या तोंडावर विखे-पाटील यांनी आपला मुलगा सुजय सह भाजपात प्रवेश केला. हा काँग्रेसला धक्का होता. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ या काळात एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी शिवसेना भाजपसमवेत सरकारमध्ये सहभागी झाली नव्हती, मात्र सत्तेत सहभागी झाल्यावर एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री (एमएसआरडीसी) झाले.

अशा रीतीने भाजपच्या गळाला दुसरा विरोधी पक्षनेता लागला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हेही आता भाजप आणि शिवसेनेच्या गोटात गेले आहेत. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले आहेत. आता त्यांच्याकडे अर्थखाते सोपविण्यात आले आहे. दरम्यान विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसमधून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात असल्याने त्यांचीच निवड होईल. कारण ते गांधी कुटुंबियांंशी सर्वात जास्त प्रमाणिक आहेत.

- Advertisement -

गेल्या ४ वर्षांत ३ विरोधी पक्षनेते हे भाजपने आपलेसे करून घेतले आहेत. त्यामुळे काँग्रेसची धाकधूक वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याने विरोधी पक्षनेतेपद आता आपोआपच महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे जाईल. या पदासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना संधी मिळण्याची शक्यता होती, परंतु दरम्यानच्या काळात तेच भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याऐवजी गांधी परिवाराशी निष्ठावान समजल्या जाणार्‍या बाळासाहेब थोरात यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत थोरात यांचा भाचा सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर तेही भाजपात जाण्याची चर्चा सुरू झाली होती, पण त्यांनी ती खोटी ठरवली. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी विरोधी पक्षनेतेपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -