घरमहाराष्ट्रतुम्ही म्हणजे हिंदुत्व नव्हे! तुम्हाला सोडले म्हणजे हिंदुत्व नाही सोडले - मुख्यमंत्री

तुम्ही म्हणजे हिंदुत्व नव्हे! तुम्हाला सोडले म्हणजे हिंदुत्व नाही सोडले – मुख्यमंत्री

Subscribe

जे आता बेंबीच्या देठापासून ओरडताय की शिवसेनेने हिंदुत्व सोडले, हिंदुत्व सोडले, कसे काय सोडले? तुम्हाला सोडले म्हणजे हिंदुत्व नाही सोडले. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. तुम्ही काय हिंदुत्वाचे पेटंट घेतलेले नाही. युती आम्ही नव्हे भाजपने तोडली. अमित शहा यांनी वचन मोडले, अशा तिखट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचा हिंदुत्वाच्या मुद्यावरून चांगलाच समाचार घेतला.
भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी कुस्तीपटू पृथ्वीराजचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, अशी सभा घेण्याची माझी सवय नाही. कारण आपण समोरासमोर लढणारे मर्द आहोत. कोल्हापूर ही तर मर्दांची भूमी आहे. आपला कुस्तीपटू पृथ्वीराजने नुकताच महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला आहे. मला स्वत:ला अभिमान आहे की पृथ्वीराजच्या रूपाने २१ वर्षांनंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाला. पृथ्वीराजचे मी मनापासून अभिनंदन करीत आहे. तरी नशीब ही निवडणूक आहे. राजकीय पक्षांच्या कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोरासमोर लढणारा मर्द कुणी नाही, पण कुस्तीमध्ये जर भाजप उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावर सीबीआय, ईडी इत्यादींची धाड टाकेल. त्यामुळे लढायचे कसे आणि तेसुद्धा मर्दाने लढायचे कसे हे कोल्हापूरच्या मातीतून शिकले पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला ईडीच्या कारवायांवरून टोला लगावला.
कोल्हापूर माझ्यासाठी नवीन नाही. माझे आजोबा आणि राजर्षि शाहू महाराज यांचे ऋणानुबंध काय होते हे शिवसेनाप्रमुखांनी आणि मीदेखील वेळोवेळी सांगितलेले आहे. त्यामुळे आपली एक नाळ जोडलेली आहे.
कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. याआधी इथे कुणीतरी सभा घेतली. त्यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी मी सभा घेतलेली नाही. बोलायला काही मुद्दे नसले की खोटे आरोप केले जातात. एक भ्रम निर्माण करायचा आणि आपले कुठे काही घोडे पुढे सरकते का हे बघायचे ही त्यांची वाईट सवय आहे. स्वत:च्या कर्तृत्वाचे सांगण्यासारखे काही नाही, म्हणून द्वेष पसरवणारे मुद्दे पुढे करायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच भाजपाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जनतेच्या साक्षीने मला विचारू द्या. आमच्या कामात कुठं खोटं असेल तर जनतेसमोर आमचा पर्दाफाश करा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी भाजपाला दिले.

शिवसेनेने झेंडा बदलला नाही

- Advertisement -

1966 साली शिवसेना जन्माला आली. तेव्हापासून शिवसेनेने कधी झेंडा, रंग किंवा नेता बदलला नाही. तुमच्या सोयीप्रमाणे भगवा वापराल तर खरा भगवा नव्हे. हिंदुत्वाची दिशा बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवली होती. आता कुठे अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी पोस्टरवर दिसतात का? सगळीकडे फक्त एकच फोटो दिसतो. भाजपकडून पंतप्रधानपदापासून ते सरपंचपदासाठी एकच फोटो वापरला जातोय. त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न

- Advertisement -

देशात भाजपने बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. लोकांनी त्याला झिडकारले. हिंदुहृदयसम्राट म्हटल्यावर लोकांच्या समोर एकच नाव येते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू अडचणीत असताना कोणतीही पर्वा न करता मदतीला जाणारा म्हणजे हिंदुहृदयसम्राट होय. भाजपचा भगवा हा खरा भगवा नाही. नकली भगव्याचा बुरखा फाडायला हवा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही खोटे बोलण्यात कमी

काही जण खोटे रेटून बोलत आहेत. ते रेटून बोलत असल्यामुळेच ते खरंय की काय, असे अनेकदा आपल्याला वाटते. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहेच. आम्ही उघडपणे सगळे करत आहोत, लपूनछपून नाही. आम्ही कमी कुठे पडतो? कामात पडतोय का, तर अजिबातच नाही. आपत्ती आली तर धावून जायला कमी पडतोय का? अजिबातच नाही. सरकार म्हणून प्रशासकीय गोष्टींमध्येही कमी पडत नाही. तरी कमी कुठे पडतो तर खोटे बोलण्यात कमी पडतो, पण आम्ही खोटे बोलणारच नाही. कमी पडलो तरी चालेल, पण आम्ही स्वत:ला शिवरायांचे मावळे समजत असल्याने खोटे बोलणे आमच्या रक्तात नाही, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेनेने धोका दिल्याचे दु:ख- रावसाहेब दानवे

राज्यात आमचेच सरकार आले होते. त्यावेळी शिवसेना-भाजपच्या युतीसाठीच आम्ही मते मागितली होती. जनतेनेही युती पाहूनच आम्हाला मतदान केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा शिवसेना नेत्यांसमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे सांगितले होते, पण शिवसेनेने दगाफटका करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. राज्यातील सरकार गेल्याचे आम्हाला दु:ख नाही, पण शिवसेनेने धोका दिल्याचे दु:ख आहे, अशी खंत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी कोल्हापुरातील भाषणात बोलून दाखवली.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -