घरमहाराष्ट्र१० तारखेला काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा धक्का?

१० तारखेला काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा धक्का?

Subscribe

येत्या १० ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा भाजप मेगा भरतीचा कार्यक्रम करण्याच्या तयारीत असून यात आता कोणते नेते भाजपमध्ये प्रवेश करणार? याविषयी चर्चा केल्या जात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते जास्त असल्याचं देखील बोललं जात आहे.

बुधवारी अर्थात ३१ जुलै रोजी भाजपनं मुंबईत मेगा भरती करत राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या ७ बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. त्यामध्ये मधुकर पिचड, कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, सागर नाईक यांचा समावेश होता. या नेत्यांबरोबरच स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं भाजपवासी झाले. मात्र, आता भाजप पुन्हा एकदा विरोधकांना धक्का द्यायला सज्ज झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या एकूण ५० नेते आणि पदाधिकाऱ्यांची यादीच भाजपनं तयार केली आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून येत्या १० ऑगस्टला भाजप पुन्हा एकदा विरोधकांना धक्का द्यायच्या तयारीत आहे. १० तारखेला ३१ जुलैसारखाच पक्षप्रवेशाचा मेगा भरती कार्यक्रम होणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी सांगितली आहे.


हेही वाचा – पक्षप्रवेश झाले, ताकद वाढली; आता युतीवर वाचा काय म्हणतात मुख्यमंत्री!

काय आहे भाजपच्या यादीमध्ये?

भाजपनं राबवलेल्या मेगाभरती कार्यक्रमामुळे विरोधकांसोबतच सर्वच घटकांमध्ये उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या एकूण ५० संभाव्य नेते आणि पदाधिकाऱ्यांची यादीच तयार केली असून आगामी काळात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे. यमध्ये उल्हासनगरच्या ज्योती कलानी, औरंगाबादचे अब्दुल सत्तार, उस्मानाबादचे राणा जगजितसिंह यांची नावं आघाडीवर आहेत. त्यातच, ३१ जुलैच्या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील यांनी ‘विधानसभा निवडणुकांपर्यंत असे अनेक प्रवेश होणार असून सगळ्यांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे जबाबदाऱ्या मिळतील’, असं वक्तव्य केल्यामुळे तर या चर्चांना अधिकच ऊत आला आहे. त्यामुळे आगामी काळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांसाठी कठीण आणि महत्त्वाचा मानला जात आहे. पक्षातल्या निष्ठावान नेते आणि कार्यकर्त्यांसोबतच कुंपणावर बसलेल्यांनाही पक्षात राखण्याचं आव्हान या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वासमोर असेल.

- Advertisement -

महाजनादेश यात्रेत विरोधकांचे पक्षप्रवेश!

मुख्यमंत्री सध्या महाजनादेश यात्रेवर आहेत. या यात्रेदरम्यान ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांने रोड शो, स्वागत कार्यक्रम किंवा जाहीर सभा होतील, त्या त्या ठिकाणी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा येत्या ९ ऑगस्टला संपत आहे. त्यानंतर १० ऑगस्टला हा पक्षप्रवेशाचा मेगाभरती कार्यक्रम होणार असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -