घरमहाराष्ट्रपक्षप्रवेश झाले, ताकद वाढली; आता युतीवर वाचा काय म्हणतात मुख्यमंत्री!

पक्षप्रवेश झाले, ताकद वाढली; आता युतीवर वाचा काय म्हणतात मुख्यमंत्री!

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजपच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना-भाजप युती करूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

राष्ट्रवादीचे नेते, आमदार, नगरसेवक आणि अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या भाजपच्या जाहीर कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये मधुकर पिचड, कालिदास कोळंबकर यांसारखी ज्येष्ठ नेते मंडळी, तर शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, चित्रा वाघ, वैभव पिचड यांसारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या फळीतले नेतेही होते. भाजपच्या या कार्यक्रमाला ‘मेगाभरती’ असं म्हणत ‘आता भाजप शिवसेनेसोबत काडीमोड घेऊन स्वबळावर लढणार’, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या चर्चांना उत्तर दिलं आहे. शिवसेना-भाजप एकत्रच लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

‘सेना-भाजपला जनसमर्थन’

‘शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळालं आहे. इतक्या लोकांनी पक्षप्रवेश केल्यानंतर भाजप आता स्वबळावर लढणार, अशा बातम्या माध्यमांनी दाखवायला सुरुवात केली आहे. मात्र, आगामी निवडणूक आम्ही शिवसेना आणि मित्र पक्षांसोबतच लढणार आहोत’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात काही जागांची अदलाबदली केली जाईल. त्याचा निर्णय पुढच्या ८-१० दिवसांत केला जाईल’, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विखे पाटलांच्या पक्षप्रवेशाचं गुपित!

अशी एक वेळ होती, जेव्हा… – मुख्यमंत्री

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी ईडीचा धाक दाखवून पक्षप्रवेश केले जात असल्याच्या टीकेला देखील उत्तर दिले. ‘एक वेळ होती जेव्हा आम्ही नेत्यांच्या मागे फिरत होतो. पण आता धाक दाखवून पक्षात घेण्याचे भाजपचे दिवस राहिलेले नाहीत. आज भाजपमध्ये येण्यासाठी खूप लोक इच्छुक आहेत. मात्र ज्यांचे समाजात काम आहे, त्यांनाच प्रवेश दिला जात आहे. भाजप ही काही धर्मशाळा नाही. चांगल्या नेतृत्वालाच पक्षात प्रवेश दिला जात आहे’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -