घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेचे इलेक्शन बजेट

मुंबई महापालिकेचे इलेक्शन बजेट

Subscribe

46 हजार कोटी रुपयांचा ‘फुगीर’ अर्थसंकल्प, भांडवली खर्चासाठी 22,646 कोटींची मोठी तरतूद

गारगाई, पिंजाळ, दमणगंगा यांसारखे नवीन पाणी प्रकल्प लवकरात मार्गी लावून मुंबईकरांची पाण्याची समस्या सोडवणे, मुंबईला कचरा मुक्त, खड्डे मुक्त , पूर मुक्त करण्यासाठी आवश्यक ठोस उपाययोजनांना बगल देत सत्ताधारी शिवसेनेने जवळपास 46 हजार कोटी रुपयांचा ‘फुगीर’ अर्थसंकल्प गुरुवारी मुंबईकरांसाठी मांडला. त्यामध्ये भांडवली खर्चासाठी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच 22,646 कोटींची मोठी तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी निधीची उपलब्धता कशी होणार ही बाब अजूनही गुलदस्त्यातच आहे. तर भाजपने महापालिका आयुक्तांनी राखीव व अंतर्गत निधीवर डल्ला मारत अर्थसंकल्प सादर केल्याची टीका करत महापालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई महापालिकेचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 45 हजार 949 कोटी 21 लाख रुपये एकूण आकारमान असलेला आणि 8.43 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांना गुरुवारी सादर केला. तत्पूर्वी मुंबई महापालिका शिक्षण खात्याचा वर्ष 2022 – 23 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 370 कोटी 24 लाख रुपये आकारमान असलेला अर्थसंकल्प सह आयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला.

- Advertisement -

या अर्थसंकल्पात मुंबईकरांना दर्जेदार रस्ते, पदपथ, पूल, आरोग्य सुविधा, उद्याने, इलेक्ट्रिक बस सेवा, दर्जेदार शिक्षण, कोस्टल रोड, पूरस्थिती नियंत्रण, नद्यांचे पुनरुज्जीवन, रुग्णालये, दवाखाने यांची दरजोन्नती, विशेष मुलांसाठी सुविधा, कचरा व्यवस्थापन, कचरा व पाण्यापासून वीज निर्मिती, मंडई विकास, ऑक्सिजन प्लांट, शाळांची दुरुस्ती आदी मूलभूत नागरी सेवासुविधांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

यामध्ये महसुली उत्पन्न 2870.24 कोटी रुपये, महसुली खर्च 2870.24 कोटी रुपये, तर भांडवली खर्च 500 कोटी रुपये दाखविण्यात आलेला आहे. गतवर्षीचा अर्थसंकल्प 39 हजार 38 कोटी 83 लाख रुपयांचा होता, त्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 6 हजार 910 कोटी 38 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

- Advertisement -

कोविडचा फटका
मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून पाय रोवून बसलेल्या ‘कोविड’मुळे मुंबई महापालिकेच्या हजारो कोटी रुपयांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कोविड नियंत्रणासाठी महापालिकेचे गेल्या दोन वर्षात तब्बल 5 हजार कोटी रुपये खर्च झालेले आहेत. तर यंदाच्या अर्थसंकल्पात एका वर्षासाठी 6 हजार 933 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली. यातून महापालिका रुग्णालये, दवाखाने यांचा विकास करून तेथे दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत.

उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना
उत्पन्न वाढीसाठी महापालिका आता अनधिकृत बांधकामांवर दंडात्मक कारवाईचा बडगा जोमाने उगारणार आहे. अनधिकृत बांधकामांचा उपग्रह, जीआयएस मॅपिंगद्वारे शोध घेऊन दोन पट दंड वसूल करून महापालिकेची तिजोरी भरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, कचरा निर्माण करणार्‍यांकडून ‘वापरकर्ता शुल्क’पोटी 174 कोटींची वसुली तर ओला कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण करणार्‍या हॉटेल चालकांकडून 26 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.

जकात बंद झाल्याने जीएसटी हप्त्यापोटी राज्य शासनाकडून महापालिकेला वर्षभरात 11 हजार 429 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मालमत्ता करातून महापालिकेला जानेवारी 2022 पर्यंत 13 हजार 543 कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या माध्यमातून 7 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. विकास नियोजन शुल्कातून 3 हजार 950 कोटी रुपये, विविध बँकांतील मुदत ठेवींवरील व्याजापोटी 1 हजार 128 कोटी रुपये, जल व मलनि:सारण आकारातून 1 हजार 596 कोटी रुपये, राज्य शासनाकडून अनुदानापोटी 1 हजार 126 कोटी रुपये, पर्यावरण आकारातून 1 हजार 390 कोटी रुपये, इतर उत्पन्न माध्यमातून 3 हजार 121 कोटी रुपये, असे एकूण 30 हजार 743 कोटी 61 लाख रुपये उत्पन्न महापालिकेला अपेक्षित आहे.

मुंबईकरांसाठी चांगला अर्थसंकल्प
पालिकेचा आजचा अर्थसंकल्प हा मुंबईच्या प्रगतीसाठी, भविष्यासाठी सादर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी यंदा भरघोस वाढ सुचवली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी जास्त आहे. यात शिक्षण, आरोग्य, घनकचरा, अग्निशमन दल आदी सर्वच खात्यासाठी उपयुक्त अर्थसंकल्प आहे. कोविड संसर्ग असतानाही महापालिकेने अर्थसंकल्पात अनपेक्षितपणे वाढ केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी जी कामे सांगितली व सुचवली त्यांचा अंतर्भाव अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे.
– यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष

‘फक्त गुलाबी स्वप्ने आणि घोषणा’
आयुक्त यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे, त्यात अंतर्गत निधीतून 27 टक्के आणि राखीव निधीतून 47 टक्के निधी उपलब्ध करण्याचे सूतोवाच केले आहे. मात्र, तो महसूल जोपर्यंत पूर्णपणे उभा राहत नाही, तोपर्यंत अर्थसंकल्प पूर्ण होणार नाही. आयुक्त निधीची उपलब्धता कुठून करणार हे स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे हा अर्थसंकल्प दिवाळखोरीतील अर्थसंकल्प आहे. केवळ गुलाबी स्वप्ने व घोषणा आहेत.
-प्रभाकर शिंदे, भाजप गटनेते

मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची फसवणूक करणारा, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा, मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि मुंबईच्या विकासाचे स्वप्न हरवलेला अर्थसंकल्प आहे. महापालिकेने त्या त्या विभागावर केलेल्या तरतुदी अत्यंत तोकड्या आहेत. मुंबईच्या विविध विकास प्रकल्पांवर केलेली तरतूदही अत्यंत तोकडी आहे. जे करायला पाहिजे ते केलेले नाही. त्यामुळे मुंबईकरांची फसवणूक झालेली आहे.
-प्रविण दरेकर,विरोधी पक्ष नेते , विधानपरिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -