घरताज्या घडामोडीआघाडीला मंत्रिमंडळ फेरबदलाचे वेध

आघाडीला मंत्रिमंडळ फेरबदलाचे वेध

Subscribe

राष्ट्रवादी, काँग्रेस खातेबदलासाठी आग्रही, काँग्रेस आमदारांचे सोनिया गांधींना नाराजीपत्र

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महाविकास आघाडीला आता मंत्रिमंडळ फेरबदलाचे वेध लागले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राज्यपालांकडून परवानगी मिळत नसल्याने निदान मंत्रिमंडळ फेरबदल मार्गी लावावा, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून पुढे आली आहे. त्यासाठी दोन्ही काँग्रेसचे नेते येत्या ७ आणि ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्या दृष्टीने आघाडीत राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून संजय राठोड यांना वन मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे खाते सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. कथित १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना

- Advertisement -

गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. सध्या देशमुख हे ईडीच्या अटकेत आहेत. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखात्याची जबाबदारी दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारण्यापूर्वी नाना पटोले यांनी फेब्रुवारी २०२१मध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त आहे आणि या पदाचा कार्यभार उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे. झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची सदस्यपदाची मुदत येत्या जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती या दोन पदांमध्ये काही अदलाबदल शक्य आहे काय? याची चाचपणी आघाडीत सुरू असल्याचे कळते.

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून नाना पटोले यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. मंत्रिमंडळातील ग्रेसच्या कोट्यातील सर्व जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसश्रेष्ठींकडून जोपर्यंत आपल्या मंत्र्यांच्या खांदेपालटाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ फेरबदल संभव नाही. शिवाय शासकीय महामंडळावरील नेमणुकाही रखडल्या आहेत. नाराज आमदारांना महामंडळावर सामावून घेण्याची आघाडीत चर्चा आहे, मात्र महामंडळ नियुक्त्यांना मुहूर्त सापडत नसल्याने अमादारांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसच्या २५ नाराज आमदारांनी निधी वाटप, मतदारसंघातील कामे होत नसल्याबद्दल थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत चर्चा होऊन काय निर्णय होतो याकडे आघाडीच्या आमदारांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

दोन खाती, विधानसभा अध्यक्षपद रिक्त
संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात दोन जागा रिक्त आहेत. काँग्रेसकडे असलेले विधानसभेचे अध्यक्षपद एका वर्षापेक्षा अधिक काळ रिक्त आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन जवळपास निम्मा कालावधी लोटत आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -