घरमहाराष्ट्रईडी, सीबीआयच्या पाठीमागे लपून लढू नका; छगन भुजबळ यांचा प्रहार

ईडी, सीबीआयच्या पाठीमागे लपून लढू नका; छगन भुजबळ यांचा प्रहार

Subscribe

जनतेत जाऊन विश्वासार्हता सिद्ध करा, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे भाजपला आव्हान

राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर जनतेत जाऊन स्वत:बद्दलची विश्वासाहर्ता सिद्ध करा. आम्ही कसे चूक आणि तुम्ही कसे बरोबर हे सिद्ध करा, असे आव्हान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी भाजपला दिले. मात्र असे न करता भाजप सरकारी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे, असा आरोपही भुजबळ यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकारणातील लढाई आपण जनतेच्या न्यायालयात लढू असे सांगितले होते. परंतु भाजप मध्येच शिखंडीसारखा केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत आहेत, असा टोलाही त्यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना लागवला.

- Advertisement -

ईडीने कारवाई केल्यानंतर जामीन लवकर मिळत नाही. मालमत्तेवरील जप्ती लवकर मुक्त होत नाही आणि वर्षानुवर्षे केस बंद होत नाही. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कारवाया या फक्त भाजप सोडून इतर पक्षातील नेत्यांवरच होत आहेत. याचा अर्थ भाजपमधील नेते शुचिर्भूत आहेत का? असा संतप्त सवालही भुजबळ यांनी केला आहे.

काही नेत्यांनी तर अशा प्रकारच्या कारवाईच्या भीतीने भाजपमध्ये प्रवेश करून टाकला आणि आता आम्हाला शांत झोप लागते असे बोलत आहेत. हा सगळा प्रकार म्हणजे रडीचा डाव आहे, असा टोलाही त्यांनी लागवला.

- Advertisement -

जसे ऊस पिळवटून टाकल्यानंतर त्याचे फक्त चिपाड उरते. अगदी त्याचप्रकारे माणसालासुद्धा पिळवटून टाकण्याचे काम या केंद्रीय तपास यंत्रणाद्वारे होत आहे. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांनीसुद्धा मनी लॉण्ड्रींग कायद्याविरोधात भाष्य केले होते. तसेच आताही सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणांचा अवास्तव वापर केला जात असल्याचे मत व्यक्त केल्याची आठवणही भुजबळ यांनी करुन दिली.

विरोधकांच्या भूमिकेला कायद्याने उत्तर देण्यासाठीसुद्धा बरीच वर्ष जातील. त्यामुळे आपण दोषी नाहीत हे आम्हाला फक्त प्रसारमाध्यमांमार्फतच जनतेपर्यंत पोहोचवावे लागेल. भाजप करत असलेला अन्याय आणि दादागिरी लोकांना कळत आहे. बऱ्याच जणांना ईडीच्या नोटीसा आल्यानंतर त्यांनी केलेला भाजपप्रवेश हादेखील लोकांना माहीत आहे. त्यामुळे लोकांना काही समजत नाही, भ्रम ठेवू नका. लोक निवडणुकांच्या वेळेला मतदानाद्वारे यावर तोडगा काढतात. त्यामुळे तुम्हाला लढायचे असेल तर राजकारणाच्या मैदानात येऊन लढा. ईडी, सीबीआयच्या पाठीमागे लपून लढू नका, असा सल्लाही भुजबळ यांनी भाजपला दिला.

एकेकाळी काही विरोधक मोदी आणि भाजपच्या विरोधात बोलत होते. मग त्यांना ईडीची नोटीस गेली आणि त्यांचे बोलणे थांबले. कोहीनूर टॉवर गैरव्यवहार आणि ३५० कोटींची खंडणी हे सारे प्रकार आपण बातम्यांमधून वाचले आहेत. मात्र आता त्यावर काहीच वाच्यता नसते, असा टोलाही भुजबळ यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लागवला.

एखाद्या व्यक्तीवर दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला जामीन मिळणे हा त्याचा हक्क आहे. परंतु ईडी आणि तत्सम विभागात तसे होत नाही. त्यामुळेच नवाब मलिक, अनिल देशमुख तसेच याआधीचेही काही लोक अजूनही तुरुंगात आहेत, अशी खंतही छगन भुजबळ व्यक्त केली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -