घरताज्या घडामोडीसमृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

नागपूर –  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देश आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने गेमचेंजर ठरेल, या महामार्गामुळे नागरिकांची मोठी सोय होईल. नागपूर ते शिर्डी थेट कनेक्टिव्हिटी या महामार्गामुळे मिळणार आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प या भागाला समुद्धी देणारा आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. नागपूर विमानतळाबाहेर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, पायाभूत सुविधा प्रकल्प कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते. यासंदर्भात पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गामुळे 16 ते 18 तासांचे अंतर 6 ते 7 तासांवर येणार आहे. मुंबई व नागपूर ही शहरे जवळ येतील, उद्योगधंदे वाढतील. शेतकर्‍यांनाही दळणवळणास मदत होईल. अनेक जिल्हे या महामार्गामुळे जोडले जातील. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. त्याच मार्गावरून प्रवास करण्याचा आज वेगळा आनंद आहे. आमच्या सरकारचा सर्वांनाच न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

मुंबई-पुणे हा देशातील पहिला अ‍ॅक्सेस कंट्रोल असलेला महामार्ग आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प प्रत्यक्षात आला. तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे मुख्यमंत्री बोलताना पुढे म्हणाले.

नागपूरहून सुरू होणार्‍या समृद्धी महामार्गावरून गाडी अशी धावते की वाटतं हा प्रवास संपूच नये, सुसाट आणि सुरक्षित.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

- Advertisement -

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची लांबी ७०१ किलोमीटर आहे. काम पूर्ण झालेल्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याची लांबी ५२० किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर आहे. यासाठी कोपरगाव तालुक्यातील १० गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. कोपरगाव इंटरचेंजपासून शिर्डीचे अंतर १० किलोमीटर आहे.

थोडक्यात समृद्धी मार्ग

एकूण लांबी:- 701 किमी.
रस्त्याची रुंदी :- 120 मी. (डोंगराळ भागासाठी 90 मी.)
मार्गिका :- 3+3 मार्गिका
वाहन वेग प्रस्तावित :- 150 किमी/तास ( डोंगराळ भागासाठी 120 किमी/तास)
प्रस्तावित इंटरचेंजेस :- 25
रस्त्यालगत उभारण्यात येणार्‍या नवनगरांची संख्या:- 18
मोठे पूल :- 32
लहान पूल :- 317
बोगदे :- 7
रेल्वे ओव्हर ब्रिज :- 8
व्हाया डक्ट, फ्लाय ओव्हर :- 73
कल्व्हर्ट :- 762
किती जिल्हा, तालुका व गावातून जाणार :- 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावे
वे-साईड एमोनिटीज :- 20 (दोन्ही बाजूस मिळून)

नागपूर येथील समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंट येथून रविवारी दुपारी १२.४५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासाला सुरुवात केली. हा पाहणी दौरा सायंकाळी ५ वाजता शिर्डी येथे पोहोचला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः वाहन चालवत होते, तर मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -