घरताज्या घडामोडीहे तर वज्रझूठ! मुख्यमंत्री शिंदेंचा आघाडीच्या सभेवर निशाणा

हे तर वज्रझूठ! मुख्यमंत्री शिंदेंचा आघाडीच्या सभेवर निशाणा

Subscribe

भाजप-शिवसेनेकडून दादर, ठाण्यात, सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध करतानाच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून रविवारी सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत दादर आणि ठाण्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. ठाण्यातील यात्रेत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना, जेव्हा चांगले लोक एकत्र येतात, तेव्हा त्याला वज्रमूठ असे म्हणतात, पण हे तर वज्रझूठ आहे, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी आघाडीच्या सभेवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, स्वातंत्र्यवीरांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता थेट समुद्रात उडी मारली. हे लोक सत्तेसाठी वेळोवेळी कोलांट्या उड्या मारत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? लोकशाहीत सभा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण वज्रमूठ सभेच्या निमित्ताने खोटी लोकं आणि सत्तेसाठी हपापलेली लोकं एकत्र आली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांना पाठीशी घालणे, त्यांच्यासोबत बसणे ही कसली वृत्ती आहे. छत्रपती संभाजीनगरात ही सभा होत आहे. याच्यापेक्षा दुसरे दुर्दैव काय?, बाळासाहेबांनादेखील यातना आणि वेदना होत असतील, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

- Advertisement -

ज्या पक्षाने संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला होता, त्याचठिकाणी ही सभा होत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हेच तर दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे. याला चोख उत्तर मिळेल. संभाजीनगर हे बाळासाहेबांच्या आवडीचे शहर होते. त्याचठिकाणी सभा होत आहे. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल जे अपशब्द काढले. त्यांचा निषेध करण्याची हिंमत हे दाखवतील का, असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला.

हे तीन तिघाडा काम बिघाडा आहे. ही लोकं विचारांसाठी एकत्र न येता सत्तेसाठी एकत्र आली आहेत. आमची विचारांची युती होती. २०१९ साली भाजप-शिवसेना युती लोकांसाठी अपेक्षित होती, परंतु आपण सत्तेसाठी विचार बाजूला ठेवले. केवळ खुर्ची आणि सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

- Advertisement -

अयोध्येला जाणार
हिंदुत्वासाठी आणि प्रभूरामचंद्र हा आमच्या आस्थेचा विषय असल्याने शिवसेनेचे नेते ९ एप्रिल रोजी अयोध्येला जाऊन आरती करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -