घरमहाराष्ट्रChitra Wagh : ...म्हणून मोदी जनतेच्या अलोट प्रेमाचे धनी, चित्रा वाघांनी संजय...

Chitra Wagh : …म्हणून मोदी जनतेच्या अलोट प्रेमाचे धनी, चित्रा वाघांनी संजय राऊतांना सुनावले

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. महायुतीकडे कोणी प्रचारक नसल्याने लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. जिथे राजकीय फायदा जास्त आहे, तिथेच पंतप्रधान जास्त जात असतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. अखंड भारतभ्रमंतीमुळे मोदी हे जनतेच्या अलोट प्रेमाचे धनी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – PM Modi : “मोदी की गॅरंटी म्हणजे गॅरंटीच…” घोषणा करून पंतप्रधानांनी केले आश्वस्त

- Advertisement -

मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊत यांनी आज, शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र सोडले होते. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जवळपास 85 जागा आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यामुळे या दोन राज्यांवर पंतप्रधान मोदी यांचे जास्त लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा धसका सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मते मिळवून देऊ शकत नाहीत म्हणूनच मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र निर्णायक भूमिकेत असणार आहे, असा घणाघात त्यांनी केला.

खासदार राऊत यांच्या टीकेला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी विकासकामांच्या उद्घाटनासाठी किंवा राजकीय सभांसाठी पायाला भिंगरी लावून देशभर फिरत असतात. हृदयात श्रीरामाचे नाम आणि मनात जनता जनार्दनाच्या कल्याणाचा ध्यास घेत त्यांची अखंड भारतभ्रमंती सुरू असते. त्यामुळेच ते जनतेच्या अलोट प्रेमाचे धनी आहेत, असे त्यांनी खासदार राऊत यांना सुनावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Fadnavis Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर बोलतात; फडणवीसांचा हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत साधे मातोश्रीपासून मंत्रालयापर्यंतही येण्याचे श्रम घेतले नाहीत. जनतेपर्यंत जाण्यासाठी साधे पाय उचलण्याचे कष्ट घ्यायचीही उद्धव ठाकरे यांची तयारी नाही, त्यामुळे मोदी यांच्या झंझावाती दौऱ्यांवर टीका करायचा सोपा मार्ग ठाकरे गटाने निवडला आहे. मोदी यांनी संवादाचे पूल बांधत भारतीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तुम्ही फेसबुक लाइव्हवरच शब्दांचे चऱ्हाट सुरू ठेवल्यामुळे जनतेच्या मनातून उतरला आहात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -