घरसंपादकीयओपेडदु:ख स्वाभाविक आणि आनंद संशयास्पद!

दु:ख स्वाभाविक आणि आनंद संशयास्पद!

Subscribe

आताच्या धकाधकीच्या जगण्यात मानसिक ताणतणाव वाढत आहेत, हा विषय चघळून चघळून कुठल्याही माराचा कसलाही परिणाम न होणार्‍या निबर झालेल्या कातडीसारखा झाला आहे. नातेसंबंध, व्यवसाय, कार्यालयातील कामाचा ताण, कौटुंबिक जीवनातील ताणतणावामुळे त्याचे परिणाम शारीरिक पातळीवरही वाढत आहेत. यातून उच्च रक्तदाबाची समस्या वाढू लागली आहे. कलेला मिळणारी दाद, चांगुलपणाचं कौतुक, हळवेपणा, समजूतदारपणा, निखळ आनंदी हास्य, तणाव विरहित चेहरा पाहिल्यास चिंता व्यक्त केली जात आहे. दुःख स्वाभाविक मानलं जातंय, तर आनंद ही संशयास्पद गोष्ट झाली आहे. नियमित जगण्यातील ताणतणावाच्या दुष्टचक्रानं माणसाला घेरलेलं वेदनेचं जगणं अंगवळणी पडलंय.

लोकल ट्रेनच्या रोजच्या प्रवासात किरकोळ कारणावरून हमरीतुमरीवर येऊन वेळप्रसंगी एकमेकांना गंभीर जखमी करण्यापर्यंतच्या हाणामार्‍या नव्या नाहीत. सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळेत हे प्रकार जास्त होतात. अनेकदा इतर ताणतणाव चिडचिड बाहेर काढण्याचा मार्ग लोकल ट्रेनच्या प्रवासात सापडणं धोक्याचं असतं. केवळ पाहिल्यानं, धक्का लागल्यानंही होणारी प्रवाशांची चिडचिड ही मानसिक ग्लानी, उच्च रक्तदाबाचा परिणाम असतो.

सामान्य माणसांचं जगणं लोकल इंडिकेटरच्या वेळेला बांधलेलं असतं. घरातल्या कौटुंबिक जबाबदार्‍या, आजारपणं, मुलांचं शिक्षण, रेशनपाणी, कर्जाचे हप्ते आणि बदलत्या भवतालसोबत समांतर धावणारं. आयुष्याला लोकलचा वेग पकडावा लागतो. कोविड काळानंतर गेलेल्या नोकर्‍या, डबघाईला आलेल्या छोट्या-मोठ्या व्यवसायांनी आता कुठे परिस्थिती स्थिरस्थावर व्हायला लागली आहे. अशा वेळी उच्च रक्तादाबासारखे आजार डोकं वर काढू लागले आहेत. यातही एन्झायटी (भीती) वाढली आहे. ही भीती भविष्याप्रती असते.

- Advertisement -

बरेचदा माणूस भूतकाळात रमत असतो आणि भविष्याची स्वप्ने रंगवत असतो. हे असं झालं तर बरं होईल, तर हे असं यापुढे व्हायला नको, तर भूतकाळाबाबत हे असं झालं, खूप वाईट झालं, हे असं झालं ते खूप उत्तम चांगलं झालं. दोन्हीकडे चांगल्या कल्पना आणि वाईट आठवणी असतात, मात्र जगणं वर्तमानातच असतं. या वर्तमानाचा बळी कायमच भविष्यातल्या कल्पना आणि भूतकाळातल्या भीतीसाठी दिला जातो. हे सगळं नकळत होत असतं, जगणं इतकं गुंतागुंतीचं आणि धकाधकीचं झालेलं असतं की या दोन्ही कल्पना आठवणीतून वर्तमानातल्या क्षणासाठी वेळ काढणं केवळ अशक्य असतं आणि हेच जगणं असतं, या भ्रमात माणूस कायम असतो. या ओढाताणीत उच्च रक्तदाब वाढत जातो.

पोषक आहार, वेळेचं नियोजन हे सुखवस्तूंसाठी असावं, ज्या ठिकाणी आपल्या उदरनिर्वाहासाठी रोजगाराची खात्री नसते, त्या ठिकाणी जगण्यातल्या वेळ इतर कामांसाठी विकला जातो. या वेळेच्या विक्रीतून माणसाचं जगणंच संपूर्णपणे लिलावात काढलं जातं, जो जास्त किंमत देईल, त्याच्या माणसांचे क्षण नि क्षण जगण्यासह ताब्यात दिले जातात. नातेसंबंधांवरही मानवी असुरक्षिततेचा पुरता प्रभाव पडलेला आहे. लग्न, सोयरीक ही भविष्यातली आर्थिक सुरक्षितता पाहून जुळवली जाते. या ठिकाणी प्रेम, जिव्हाळा, आत्मियता आवडनिवड या दुय्यम असतात. यातून वैवाहिक संबंधातला तणाव वाढत जातो. पुढे हा तणाव मानसिक, शारीरिक आजारांना कारण ठरतो. मोबाईल, इंटरनेटमुळे घराघरातला संवाद कमी होऊन नातेसंबंध प्रमाणाबाहेर संकुचित होत जातात. जगण्याचं संतुलन राखताना ही कसरत हाताबाहेर जाते.

- Advertisement -

देशात सर्वाधिक कारणांनी मृत्यू होणार्‍या व्याधींमध्ये उच्च रक्तदाब एक महत्वाचं कारण असतं. वैद्यकीय भाषेत हळूहळू दबक्या पावलांनी येणारा मृत्यू असंही म्हणतात. उच्च रक्तदाब वाढीस लागतो. याची लक्षणे सामान्यपणे लवकर लक्षात येत नाहीत, त्यामुळेच धोका वाढत असतो. यातून अचानक येणारा हृदविकाराचा धक्का, पक्षाघात असा कमालीचा धोकादायक असतो. चिंता आणि चिता यात केवळ एकाच अनुस्वाराचा फरक असतो. जगण्यातली वेळ उदरनिर्वाहाच्या शर्यतीत गहाण पडल्याने नाईलाजाने माणसाला वेठबिगारी आयुष्य जगावे लागते.

बरेचदा सुखाच्या संकल्पना बाहेरच्या व्यावसायिक जगाने चुकीच्या पद्धतीने बदललेल्या असतात. त्यात कर्ज काढून घर घ्यायलाच हवं, आजच्या जगात गाडी घ्यायलाच हवी, नव्या महागडा मोबाईल, फ्लॅट स्क्रिन टीव्ही, अगदी कपड्यांच्या बाबतीतही पुरेशा गरजेच्या नसलेल्या गोष्टीही मार्केटींगमध्ये माथी मारल्या जातात. बाहेरच्या व्यावसायिक मूल्यांमध्ये कमालीच्या स्पर्धा असल्याने माणसांचं जगणंच एक बाजारमूल्य होऊन जातं. हे माणसाचं झालेलं बाजारमूल्य टिकवण्यासाठी कर्जे काढली जातात, वर्षानुवर्षे ती फेडली जातात. प्रतिष्ठेच्या बोगस संकल्पना तयार करून त्यात माणसांना, कुटुंबांना हळूहळू संपूर्ण सामाजिक व्यवस्थेलाच अडकवलं जातं. संपूर्ण समाजव्यवस्था ही भांडवली व्यवस्थेसाठी एका मोठ्या न संपणार्‍या बाजारासारखी काम करू लागते.

‘इंडियन इनिशिएटिव्ह ऑफ हायपरटेन्शन कंट्रोल’ संस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशातील २० कोटी तरुण आणि मध्यमर्गीय नागरिकांना हायपरटेन्शनचा त्रास आहे, तर केवळ २ कोटी लोकांचा रक्तदाब नियंत्रणात राहात असल्याचीही माहिती अभ्यासातून पुढे आली आहे. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालयाने २०२५ च्या अखेरपर्यंत संसर्गजन्य आजारांनी होणारे मृत्यू २५ टक्क्यांनी कमी करण्याचं ध्येय ठेवलं आहे.

असे असताना शारीरिक आजारांची मानसिक कारणे दुर्लक्षित केली जात आहेत. ताणतणावाची लक्षणं जवळपास सर्वच व्यक्तींमध्ये आढळतात. हृदयाचे ठोके वाढतात, छातीची धडधड वाढते, हे एन्झायटी (भीती)चे लक्षणही असू शकते, ही भीती अनेकदा भवतालमध्ये असलेल्या तणावातून निर्माण झालेली असते. आजच्या ७ ते १८ वयातल्या बालकांना असा भीतीने भरलेला भवताल घेरून आहे. कारण या मुलांचे तरुण पालकच आज जगण्यातल्या स्पर्धेत मागे पडण्याच्या काल्पनिक भीतीने भारलेले आहेत. उच्च रक्तदाब हे सामान्य जगणं झालेलं आहे.

निखळ हसू, आनंद, समाधान, शांतता हे शब्द सुखाच्या बदलत्या संकल्पनांनी कधीचेच निकालात काढले आहेत. आज गंभीर चेहरा असलेली माणसं सामान्य वाटू लागली आहेत, तर एखादी व्यक्ती आनंदात असेल, तर तो चुकीचं वागतोय अशी उफराटी तर्‍हा या नव्या समाज समुदायाची झालेली आहे. आनंदावर संशय व्यक्त केला जातोय, तर दुःख स्वाभाविक मानलं जातंय. हे कमालीचं मानसिक अवमूल्यन झालेल्या समाजाचं लक्षण आहे.

एखाद्याला कुठलंच टेन्शन नाही, अशा व्यक्तीवर लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत, टेन्शन नाही तर तो माणूस बिनकामाचा असं मानलं जात आहे. माणूस म्हटला की त्याला दुःख असायलाच हवं, काही अंशी मानवी जगण्यात दुःख असतंच, मात्र ते उपजत, नैसर्गिक आणि स्वाभाविक स्वरुपाचं असलं की ते जगण्यावर परिणाम करत नाही, परंतु व्यावहारिक जगातल्या सुख-दु:खांच्या बदलत्या संकल्पनांनी माणसांचं निखळ जगणं हे मार्केटींगच्या जंजाळात अडकवून टाकलं आहे.

अलीकडच्या काळात भारतात आत्महत्येची प्रकरणे वाढली आहेत. चिंता, उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. याची लक्षणे भवताली असलेल्या माणसांच्या निरीक्षणावरूनही सहज ध्यानात येणारी आहेत. डोकेदुखीचा त्रास वाढतो आहे. श्वास घ्यायला होणारा त्रास, धाप लागणं, छाती दडपल्यासारखी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, संभ्रमावस्था, दृष्टीदोष, थकवा, मानेवर घाम आणि छातीत दुखणे, अशी ही लक्षणे आहेत. सध्याच्या भवतालमध्ये २५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या माणसांनी रक्तदाब तपासणे आवश्यक आहे.

वाढत्या रक्तदाबाला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी शक्य तेवढे आहाराचे नियोजन आणि ध्यानधारणा, व्यायाम करणे गरजेचे आहे. विकसनशील देशांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण जास्त असल्याचं वैद्यकीय संस्थांच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. भारतासारख्या विकसनशील आणि कमालीची लोकसंख्या आणि स्पर्धा असलेल्या देशात याचं प्रमाण अधिक असणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे चालण्याचा व्यायाम, आहारावर नियंत्रण, व्यसनांपासून दूर राहाणे, विरंगुळा, कला, छंद जोपासण्याची गरज आहे. कला किंवा छंद हा वेळेचा अपव्यय मानणार्‍यांच्या या काळात व्यवहारशून्यता हा मूर्खपणा ठरत आहे.

दुसरीकडे मनोरंजनाची साधनेही बदलली आहेत. केवळ ओटीटीवरील सिनेमे पाहतानाही हे ध्यानात यावे. लव्ह, सेक्स आणि धोका, हिंसा, रक्तस्नान, रक्ताचा सडा यावरही आता भागत नाही. लोकांच्या जाणिवा कमालीच्या भेसूर होत आहेत. अलीकडेच अ‍ॅनिमल नावाच्या सिनेमाने तिकीटबारीवर कमालीचे यश मिळवल्याच्या बातम्या आल्या. यावर ज्येष्ठ सिनेकथा लेखक जावेद अख्तर यांनी चिंता व्यक्त केली. कुठल्याही परिस्थितीत समोरच्या व्यक्तीला वस्तूसारखे आपल्या दावणीला बांधून ठेवायचे म्हणजेच प्रेम ही संकल्पना या चित्रपटाने मांडली आहे, तर महिलांना गुलामासारखी वागणूक देणे म्हणजेच पुरुषार्थ, असा नवा अर्थतर्क सिनेमात रुजत आहे.

ही सगळी वाढत्या तणावाची कारणे आहेत. यातील नायक हा कौटुंबिक हिंसा आणि नात्यातील तणावाचा बळी आहे, परंतु या माणूसपणातून हिंसक अशा पशुत्वात बदलणार्‍या माणूसपणाच्या हिडीस मूल्यांचे समर्थन स्वागत करणारे, टाळ्या पिटणारे प्रेक्षक हे ताणतणावातून माणूसपणापासून दूर जाणार्‍या समाजसमुदायाचं प्रतिनिधित्व करणारे आहेत, ही प्रातिनिधीक उदाहरणे सगळ्याच क्षेत्रात वेगवेगळ्या संदर्भाने पहायला मिळतील, कमालीचा मानसिक तणाव ही सर्वमान्य, स्वाभाविक अशी अति सामान्य बाब झाली आहे, नव्हे ते प्रतिष्ठेचे लक्षणही ठरत आहे. सामान्य माणसांच्या जगण्यातले हे बदल येत्या पिढीसाठी कमालीचे धोकादायक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -