गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमली सुकाणू समिती

sukanu committee for conservation of forts in maharashtra

गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुकाणू समिती गठीत केली आहे. गडकिल्ल्याच्या परिसरात पर्यटनासाठी सुविधा निर्माण करणे, परिसराचे जैवविविधता जतन आणि वनीकरण करणे तसेच या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी शासन निर्णयाद्वारे या सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. एका शासन निर्णयाद्वारे सुकाणू समितीच्या कार्यकक्षाही निश्चित करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात सुकाणु समितीमार्फत सहा किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री हे या समितीचे उपाध्यक्ष असून समितीत सदस्य म्हणून महसूल, सांस्कृतिक कार्य, पर्यटन आणि वन विभागाच्या मंत्र्यांचा समावेश आहे. राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

राज्य सरकार या योजनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड आणि तोरणा या सहा किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.

सुकाणू समितीच्या कार्यकक्षा आहेत तरी काय ?

राज्यातील गडकिल्ल्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अग्रक्रम ठरविणे अपेक्षित आहे. या निवड करण्यात आलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाचे कामकाज हे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येईल. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विविध सुविधा उपलब्ध करणे व परिसरात पर्यटन केंद्र उभारणे या विषयीची कार्यवाही पर्यटन विभागामार्फत करण्यात येईल. जैवविविधता जपतानाच गडकिल्ल्याचे हरितीकरण करण्याची जबाबदारी ही वनविभागाची असेल. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून पोहोच रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात येतील. एकुणच या उपक्रमाची माहिती ही माहिती आणि जनसंपर्क विभागामार्फत करण्यात येईल.

गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम, त्यांचे पावित्र्य जपत, त्यांचा एतिहासिक वारसा आणि पुरातत्व वारसाला कोणताही धक्का लागणार नाही याचीही काळजी घेण्यात येईल. या गडकिल्ल्यांच्या आजूबाजूला असलेल्या ५० कि मी अंतरावर असलेली पर्यटन स्थळे, साहसी खेळ, गिर्यारोहण, किल्ल्यांचे एतिहासिक संदर्भ, तिथे घडलेला पराक्रम, तिथले वन्यजीव, तिथली वनसंपदा, जैवविविधता जोपासत आजुबाजुची लोकपरंपरा, गडाच्या अनुषंगाने काही लढाया झाल्या असतील झाल्या असतील तर, या सगळ्या गोष्टींची माहिती संकलित करून गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात पर्यटन केंद्र विकसित करणे, मूळ गडाची प्रतिकृती तयार करणे, पूर्वीचे एतिहासिक वातावरण निर्माण करणे, लाईट एण्ड साऊंड शो दाखविणे, यासाठीचा विकास आराखडा संबंधित यंत्रणांमार्फत मागवून पर्यटन विभागाने संनियंत्रण समितीला सादर करावा.

गडकिल्ल्यांच्या परिसरात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बिया टाकून नैसर्गिकरित्या या भागात वनराई विकसित करणे करणे अपेक्षित आहे. या समितीची बैठक दर तीन महिन्यात एकदा होणे अपेक्षित आहे.