घरमहाराष्ट्रमराठा विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून काँग्रेस अलिप्त; राष्ट्रवादी मात्र सक्रीय

मराठा विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून काँग्रेस अलिप्त; राष्ट्रवादी मात्र सक्रीय

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेला मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा तिढा आज अखेर सुटला. राज्य सरकारने अध्यादेश काढून प्रवेशाबाबत तोडगा काढला आहे. मराठा समाजातील विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलनाला बसल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा तसेच विविध राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सरकारला विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेणे भाग पडले. यादरम्यान अनेक पक्षांचे नेते विशेषतः राष्ट्रवादीच्या सर्वच वरीष्ठ नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात धाव घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विद्यार्थ्यांनी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मनसेचे नेते राज ठाकरे यांची देखील विद्यार्थ्यांनी भेट घेतली. मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली २०१४ साली मराठा आरक्षणाचा पहिल्यांदा निर्णय झाला ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आंदोलनापासून अलिप्त राहिले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सर्वात पहिल्यांदा आझाद मैदानात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर अजित पवार विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ घेऊन थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी गेले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे आणि नवाब मलिक यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

- Advertisement -

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची देखील मराठा विद्यार्थ्यांनी भेट घेतली. आपले प्रश्न राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्यानंतर राज ठाकरे यांनी देखील आक्रमक होत सरकारवर निशाणा साधला होता. भाजपचे राज्यसभेतील खासदार संभाजीराजे भोसले यांनी देखील आझाद मैदानात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.

एकीकडे दुष्काळाच्या प्रश्नावर शरद पवार राज्याचे दौरे करून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळाची उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील प्रश्नात देखील लक्ष घातले. मात्र काँग्रेसचे नेते दोन्ही प्रश्नांवर तितकेसे आक्रमक झालेले दिसले नाहीत. काँग्रेसतर्फे भाई जगताप आणि हुसेन दलवाई यांचा अपवाद वगळता दुसरा कोणताही ज्येष्ठ नेता विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात दिसला नाही.

आघाडी सरकार काळात काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच १६ टक्के मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसचे माजी नेते नारायण राणे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते. आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेसने तेव्हा महत्त्वाची भूमिका बजावली असताना आता मात्र काँग्रेस पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाच्या आंदोलनापासून अलिप्त राहिलेली दिसली. मात्र राष्ट्रवादीने दुष्काळ आणि आरक्षण या दोन्ही प्रश्नांमध्ये लक्ष घालून आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी केली असल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -