घरमहाराष्ट्रकाँग्रेस, राष्ट्रवादीचे धरण फुटले!

काँग्रेस, राष्ट्रवादीचे धरण फुटले!

Subscribe

३० जुलैला मुंबईत प्रवेशाची शक्यता

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही आपली डाळ शिजणार नाही, या पराभूत मानसिकतेच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार तसेच प्रमुख नेत्यांची भाजप प्रवेशासाठी जोरदार धावपळ सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जणू धरणच फुटल्यासारखे त्यांचे लोकप्रतिनिधी सैरावैरा होऊन पळत सुटले आहेत. भाजपमध्ये आपण गेलो नाहीतर आपले राजकीय भविष्य शून्य आहे, या भीतीपोटी ही पळापळ असल्याचे चित्र आहे.

आमदार कालिदास कोळंबकर, सुनील केदार, जयकुमार गोरे, गोपालदास अग्रवाल, भारत भालके आणि सिध्दाराम म्हेत्रे हे सारे जण काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी उत्सुक आहेत.

- Advertisement -

तर, बबनदादा शिंदे, दिलीप सोपल, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. मंगळवारी ३० जुलैला मुंबईत या सर्वांना प्रवेश दिले जाणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा १ ऑगस्टपासून सुरू होत असून त्यापूर्वी हे प्रवेश देऊन विरोधकांना मोठा धक्का देण्याचे भाजपने ठरवले आहे. आमदार कालिदास कोलंबकर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले की, माझे भाजपात जाण्याचे निश्चित झाले असून, ३० जुलैला सकाळी साडे दहा वाजता भाजपात प्रवेश करणार आहे.

सुनील केदार आणि जयकुमार गोरे हे काँग्रेस आमदार लोकसभा निवडणुकीपासून फडणवीस यांच्या संपर्कात होते. तर, पंढरपूरला आषाढी एकादशीच्या पूजेनंतर मुख्यमंत्र्यानी भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे यांची भेट घेऊन त्यांना योग्य वेळी तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल, असे आश्वस्त केले होते. गोंदियाचे ज्येष्ठ काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांचाही गेले काही महिने काँग्रेसमध्ये जीव गुदमरत होता. फडणवीस यांच्याशी त्यांची बोलणी झाल्याचे समजते.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सोलापूरमध्ये आहेत. मात्र या मुलाखतींना पक्षाचे दोन विद्यमान आमदार अनुपस्थित राहिले आहेत. माढ्याचे आमदार आणि बार्शीचे आमदार बबनदादा शिंदे आणि दिलीप सोपल यांनी अजित पवारांकडे मुलाखतीसाठी जाणे टाळले.

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे तुरुंगात असून तेसुद्धा भाजपमध्ये जाण्यासाठी तयार असल्याचे सांगितले जाते. बबनदादा शिंदे यांनी आपल्याऐवजी आपले चिरंजीव रणजित शिंदे यांना तिकीट देण्याची फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे. तर, दिलीप सोपल यांना भाजपकडून शिवसेनेत जाण्यास सांगण्यात आले आहे. सातार्‍याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनाही राष्ट्रवादी सोडण्याची तयारी केली आहे.

सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्यानंतर चित्रा वाघ आणि वैभव पिचड भाजपत प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन दिवसांत चित्रा वाघ आणि वैभव पिचड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. वैभव पिचड अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या भेटीदरम्यान राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते.

भाजप आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड हे चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेऊन गेले आणि या भेटीतच चित्रा वाघ यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याचे समजते. दरम्यान, याबाबत चित्रा वाघ यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटण्यासाठी तयार : बबनदादा शिंदे, दिलीप सोपल, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ.

काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी उत्सुक : कालिदास कोळंबकर, सुनील केदार, जयकुमार गोरे, गोपालदास अग्रवाल, भारत भालके, सिध्दाराम म्हेत्रे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -