घरमहाराष्ट्रभुजबळांच्या घरवापसीला शिंदे, राऊत, देसाईंचाच विरोध!

भुजबळांच्या घरवापसीला शिंदे, राऊत, देसाईंचाच विरोध!

Subscribe

शिवसैनिकांचा विरोध हा बनाव,भुजबळांची ज्येष्ठता पचवणे अवघड,मातोश्रीच निर्णय घेणार,मुंबईत ठिकठिकाणी विरोधाची पोस्टरबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यातील राजकारणाची नस ओळखणारे छगन भुजबळ यांना शिवसेनेत परत यायचे होते. त्यासाठी त्यांनी एक-दोनदा नव्हे तर तीन वेळा प्रयत्नही केले. मातोश्रीकडून सुरुवातीला ‘हो नाय, हो नाय’, करत त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेत आले तर सध्या असलेल्या नेत्यांना त्यांच्या हाताखालीच काम करावे लागेल. कारण त्यांच्या एवढा वरिष्ठ नेता शिवसेनेत सध्यातरी नाही. त्यामुळे ‘छगन भुजबळ परत आल्याने आपलं काय होईल’, या भीतीपोटीच एरव्ही वेगवेगळ्या गटातटाचे राजकारण करणारे शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे एकत्र आले आणि सेनेतील या त्रिकुटाने भुजबळांचा होऊ घातलेला खात्रीलायक प्रवेश लांबवल्याची विश्वसनीय माहिती आहे.

छगन भुजबळ यांच्या सेनेत परत येण्याच्या चर्चेने शिवसैनिक काहीसे उद्विग्न झाले आहेत. याच भावनेतून त्यांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी करून छगन भुजबळ यांना विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची लवकरच घर वापसी होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर काही शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या. रविंद्र तिवारी या शिवसैनिकाने तसे बॅनर मुंबईत अनेक ठिकाणी लावले आहेत. अगदी मातोश्री कलानगर, शिवसेना भवन, वरळी सी-लिंक, घाटकोपर, विक्रोळी परिसरात हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. छगन भुजबळांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश नको. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भुजबळांनी जो त्रास दिला ते शिवसैनिक अजूनही विसरलेले नाही. अशा मजकुराचे हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्यामुळे भुजबळ जर शिवसेनेत परत आले तर त्यांना शिवसैनिकांच्या नाराजीचा सामना करावा लागणार हे स्पष्ट आह

- Advertisement -

शिवसेनेतील या तीनही नेत्यांच्या चालीला साथ दिली ती नाशिकमधील शिवसेनेचा चेहरा असलेला आणि विद्यमान राज्यमंत्री दादा भुसे यांनी. त्यामुळे या सर्वांच्या विरोधामुळेच काही महिन्यांपूर्वी ग्रीन सिग्नल दिलेल्या छगन भुजबळांना मातोश्रीने आता रेड सिग्नल देत वेटिंग रुममध्ये ठेवले आहे. त्यामुळे वरकरणी जुन्या शिवसैनिकांचा छगन भुजबळ यांना विरोध असल्याचे चित्र पडद्याआडून करत असल्याची विश्वसनीय माहिती ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे.

शिवेसेना सोडून गेलेल्यांना पुन्हा थारा नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर छगन भुजबळही सेनेत परततील, असे काही मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले. गेल्या आठवडाभर छगन भुजबळांच्या प्रवेशाला कडाडून विरोध करण्याची रणनिती सुभाष देसाई, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांनी आखली. त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांना, आपल्याला आता बाहेरील नेत्यांची गरज नाही. शिवेसेना सोडून गेलेल्यांना तर आता आपण जवळही करायला नको. त्यात छगन भुजबळ यांच्या सारखा नेता ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, उत्पन्नापेक्षा अमाप संपत्ती असल्याचे तसेच मनी लॉड्रिंगचे आरोप झालेले असल्याने ते पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतात. विरोधी पक्षाला प्रचारात हे आयत कोलीतच मिळू शकतं, असा सूर तिघांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लावल्याचे कळते. यातून छगन भुजबळ पक्षात आल्यानंतर सध्याच्या नेत्यांपेक्षा त्यांना राजकारणाची जास्त जाण आहे. शिवसेनेतून फुटून गेलेल्या नारायण राणे यांच्याच ताकदीचा नेता सध्या भुजबळच असल्याने त्यांचा पक्षातील प्रवेश हा थेट मातोश्रीच्या कोअर कमिटीतच होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग होईल, या भीतीपोटी या तिनही नेत्यांनी छगन भुजबळ यांचा प्रवेश लांबवल्याचे खात्रीलायक गोटातून कळत आहे.

- Advertisement -

नाशिकमधूनही विरोधाचे सूर
भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतील आपलं बस्तान नाशिककडे वळवले. त्याचवेळी त्यांनी आपला मुलगा पंकज आणि पुतण्या समीर त्यांनाही राज्याच्या राजकारणात स्थिरस्थावर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक चांदा ते बांधापर्यंत घराघरा नेली. त्यामुळे राष्ट्रवादी वाढवण्यास छगन भुजबळांचा सिंहाचा वाटा आहे.

तसेच ओबीसी आणि माळी या समाजाचे नेतृत्वही त्यांच्याकडेच असल्याने भुजबळांसाठी शिवसेनेतील पक्षप्रवेशाच्या मार्गावर अडथळे निर्माण करत आहेत. नाशिकमध्ये शिवसेना उभी करण्यात अत्यंत सालस आणि कुणालाही न दुखावणारे असे नेते म्हणजे दादा भुसे हे होत. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना घरोघरी पोहोचवण्यात दादा भुसे यांचाही खारीचा वाटा आहे. त्यामुळे या तिनही नेत्यांनी दादा भुसे यांनाही आपल्या चौकडीत सामील करून छगन भुजबळांचा विरोध नाशिकमधूनही होत असल्याचे चित्र गेले काही दिवस रंगवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -