घरमहाराष्ट्रकर्जमुक्ती, चिंतामुक्ती कुठे गेली ? देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल

कर्जमुक्ती, चिंतामुक्ती कुठे गेली ? देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल

Subscribe

आघाडी सरकारकडून शेतकर्‍यांची फसवणूक

राज्यात अतिशय भयाण परिस्थिती असून प्रशासक कुठेही दिसत नाही. शेतकर्‍यांच्या मदतीसाठीच्या योजनेला महात्मा फुलेंचे नाव देताना योजना फसवी नसावी, असा टोला लगावताना आता कुठे गेली तुमची कर्जमुक्ती, कुठे गेली शेतकर्‍यांची चिंतामुक्ती? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केला. इथे आगी लागतात आणि इथे कुंपणच शेत खात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. पीक विम्याचे पैसे मिळत होते, तेव्हा मोर्चे काढले गेले. आज पैसे मिळत नाहीत तर मोर्चे काढणारे गप्प आहेत. आमच्या काळात विमा हप्त्याच्या ११२ टक्के पैसे मिळत असताना आज केवळ २० टक्केच पैसे मिळत असल्याची टीका करत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

विरोधी पक्षाच्या २९३ च्या प्रस्तावावरील चर्चेची सुरुवात करताना फडणवीस यांनी दारुवरील कर कमी करणे, एसटी कर्मचारी आंदोलन, परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकरी मदत आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या, मराठवाडा आणि विदर्भावरील अन्याय, अशा अनेक मुद्यांवर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेल्या ८ हजार ९१६ कोटींपैकी ७९३ कोटी रुपये अजूनही शेतकर्‍यांना या सरकारने दिलेच नाहीत. रोज कशाला खोटे बोलता. महात्मा फुलेंचे नाव देताना योजना फसवी नसावी. वन टाईम सेटलमेंट योजना, ५० हजार रुपये प्रोत्साहनपर मदत… या घोषणा होऊन दोन वर्षे झाली. ना शासन आदेश, ना अंमलबजावणी झाली. मात्र, शेतकर्‍यांची फसवणूक झाली, असा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या नाहीत. मात्र, दारुवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर टीका करताना फडणवीस यांनी कवितेचा आधार घेतला.

मुंबईसह महाराष्ट्र, बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र, हीच आमची भूमिका आहे. पण विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात नाही का? असा सवाल त्यांनी केला. वैधानिक विकास मंडळ काढून घेण्याचे पाप या सरकारने केले. ही कवच-कुंडले तुम्ही काढून घेतली. आता विदर्भ-मराठवाड्यावर अन्यायाची मालिका सुरू असून वीज सवलत बंद करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचे निकष बदलून अन्याय केला. बळीराजा सिंचन अभियान मंजूर करवून आणले, आज सिंचनाची कामे बंद होत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

मराठवाडा वॉटरग्रिडचे काम थंड बस्त्यात असून दुष्काळमुक्तीचे स्वप्न दुरावणार आहे. नदीजोड प्रकल्प आता नियोजनात नाही. अनेक योजना बंद किंवा संस्थगित आणि उर्वरित योजनांना हळूहळू बंद करण्याच्या तयारीत आहेत. वीज सवलत नसल्याने उद्योग परत जाण्याच्या तयारीत असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.

विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम आज जाहीर होणार?
विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमात बदल केल्यानंतर या पदासाठी आज, शुक्रवारी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २८ डिसेंबरला निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. आज अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली तर त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार, २७ डिसेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर दुसर्‍या दिवशी निवडणूक होईल.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -