घरमहाराष्ट्रविधानसभेत फडणवीसांनी वाचला मविआच्या घोटाळ्यांचा पाढा; 'मद्य विक्री आघाडी' म्हणत चढवला हल्ला

विधानसभेत फडणवीसांनी वाचला मविआच्या घोटाळ्यांचा पाढा; ‘मद्य विक्री आघाडी’ म्हणत चढवला हल्ला

Subscribe

पदाधिकार्‍यांच्या कंपन्यांनाच कामे दिली जात आहेत, बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. मुंबई मेली तरी चालेल, यांचे घर भरणे सुरू आहे. कुणी बोलले तर ते मुंबईचे, मराठीचे, महाराष्ट्राचे शत्रू, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र डागलंय.

मुंबईः विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांचा पाढा वाचत त्यांना मद्य विक्री आघाडी असं म्हटलंय. राज्यातील गेल्या 2 वर्षांतील चित्र पाहून वाटले की, महाविकास आघाडी ही महाविनाश आघाडी
महावसुली आघाडी आहे. पण आता हेही लक्षात आले की ही मविआ म्हणजे ‘मद्य विक्री आघाडी’ आहे, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अशा विविध विषयांवर विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत बोलत आहेत.

मंदिर बंद होती, पण मदिरालयं सुरू ठेवली. क्लास बंद होते. पण ग्लास सुरू होते, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवलाय. विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीतही घोटाळा, भंगारात घोटाळा, रस्ते चरभरणी घोटाळा, आश्रय योजनेत घोटाळा, पेंग्विन देखभालीत घोटाळा, ई-टेंडरमध्ये घोटाळा, नालेसफाईत घोटाळा, उद्यान विकासात घोटाळा, पम्पिंग स्टेशनमध्ये घोटाळा, मालमत्ता कर वसुलीत घोटाळा, केईएम रुग्णालयात भ्रष्टाचार, बेस्टच्या डिजिटल तिकीट निविदेत घोटाळा, कोविड सेंटर उभारणीत घोटाळा, साहित्य खरेदीत घोटाळा, उपकरण खरेदीत घोटाळा, संचालन कंत्राटात घोटाळा, मनुष्यबळ पुरवठ्यात सुद्धा घोटाळा, डेडबॉडी कव्हर खरेदीत घोटाळा, फेसमास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड खरेदीत घोटाळा, रेमडेसिवीर खरेदी घोटाळा, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांचा पाढा वाचलाय. पदाधिकार्‍यांच्या कंपन्यांनाच कामे दिली जात आहेत, बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. मुंबई मेली तरी चालेल, यांचे घर भरणे सुरू आहे. कुणी बोलले तर ते मुंबईचे, मराठीचे, महाराष्ट्राचे शत्रू, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र डागलंय.

- Advertisement -

मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा आर्थिक व्यवस्थापनात मुंबई महापालिका 45 व्या क्रमांकावर आहे. केवळ लुटण्याचे काम सुरू आहे. देण्याची भावना असलीच पाहिजे, पण त्याचवेळी घेण्याची नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. तसेच देवेंद्र फडणवीसांनी काही कवितांचा हवाला देत सरकारच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलंय. पी. एल. बामनिया नावाचे कवी आहेत. त्यांची कविता सद्याचे सरकार कसे आहे, याची जाणीव करून देते. तुम चाहो तबेलो को बाजार कह दो। तुम चाहो पतझडो को बहार कह दो !, असंही फडणवीसांनी अधोरेखित केलंय. विंदा करंदीकर यांची कविता सद्याच्या राजकारणावर भाष्य करते. लोकांसाठी सरकार असते, याची थोडीही जाणीव दिसत नाही. कविवर्य विंदा करंदीवर म्हणतात, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!, असंही ते म्हणालेत.

कोविड सेंटरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय. अनुभव नसलेल्यांना कामे आणि रिकामे राहिल्यानंतर सुद्धा पेमेंट दिले जात आहे. 15 दिवसांत ब्लॅकलिस्ट केलेल्यांना मुंबईत 5 कोविड सेंटरची कामे देण्यात आलीत. ऑक्सिजन प्रकल्पांसाठी काम दिलेल्या तिन्ही कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत. हायवे कंपनीवर किती कृपा? हे हायवे बांधत नाही. आम्ही खोलात गेलो, तेव्हा त्यांचा GST एका डिपार्टमेंटल स्टोअरचा असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.

- Advertisement -

आरोग्याच्या बाबतीत मुंबई महापालिकेत स्थिती काय? इंजेक्शन आणि सर्वसाधारण लसी शेड्युल 1 : जुलै 2021 मध्ये करार संपला. नवीन निविदा अद्याप नाही. त्यामुळे रुग्णांना खासगीतून लस खरेदी करावी लागतेय. शेड्युल 2 औषधे : जुना करार जानेवारी 2022 मध्ये संपुष्टात, नवीन अद्याप नाही. त्यामुळे या टॅबलेट आणि कॅप्सुल रुग्णालयात उपलब्ध नाहीत. शेड्युल 3 औषधे : सायरप आणि ऑईंटमेंट : फेब्रुवारी 2022 मध्ये निविदा संपुष्टात, नवीन निविदा नाहीत. शेड्युल 4 : एक्स-रे फिल्मसह एकूण 250 साहित्य : जून 2021 मध्ये 100 प्रकारच्या साहित्यासाठीच निविदा काढल्यात. उर्वरित अजून प्रलंबित आहेत. शेड्युल 5 : डिसइन्फेक्टंट आणि अन्य : केवळ 50 टक्के निविदा, उर्वरित अजूनही प्रलंबित आहेत. शेड्युल 6 : 2 वर्ष विलंब केल्यावर नुकतीच मंजुरी, शेड्युल 7 : कॉटन बँडेज : डिसेंबर 2019 मध्ये निविदा जारी : अद्याप अंतिम नाहीत. शेड्युल 8 : नीडल आणि सिरिंज : केवळ 50 टक्के अंतिम. शेड्युल 9 : सर्जिकल उपकरणे : केवळ 50 टक्के अंतिम, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढले आहेत.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -