घरमहाराष्ट्रधुळे, अहमदनगरमध्ये मतदान संपलं, मोजणीची प्रतिक्षा!

धुळे, अहमदनगरमध्ये मतदान संपलं, मोजणीची प्रतिक्षा!

Subscribe

धुळे आणि अहमदनगर महानगर पालिकांसाठी रविवारी मतदान झाले असून सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली आहे.

पुढील वर्षी आधी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि नंतर होणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आणि त्याच्या आधी सध्या सुरु असलेल्या ५ राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण देखील तापू लागलं आहे. अशातच धुळे आणि अहमदनगर महापालिकांसाठी रविवारी मतदान झालं. भाजपशी बंडखोरी करून स्वत:चा लोकसंग्राम पक्ष काढणारे आमदार अनिल गोटे यांच्यामुळे धुळे महानगर पालिका निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती, तर शिवाजी महाराजांबद्दर कथित अनुद्गार काढणारे श्रीपाद छिंदम यांच्यामुळे अहमदनगरची निवडणूक चर्चेत होती. अखेर या दोन्ही महानगर पालिकांसाठीचं मतदान संपलं असून आता सर्व नजरा सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे वळल्या आहेत.

धुळ्यात गोटेंना काय मिळणार?

धुळे महापालिकेतल्या एकूण ७४ जागा आहेत. त्यातल्या ७३ जागांसाठी रविवारी मतदान झाले असून एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. मात्र, सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीत होतं ते अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाकडे! धुळे महानगर पालिकेसाठी एकूण ६० टक्के मतदान झाल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. धुळ्याच्या १९ प्रभागांमध्ये या ७४ जागा विखुरल्या आहेत. या प्रभागांमध्ये अनुसूचित जातींसाठी ६, अनुसूचित जमातींसाठी ५ तर मागासवर्गासाछी २० जागा राखीव होत्या. लोकसंग्राम पक्षाने जरी निवडणुकीत धुरळा उडवून दिला असला, तरी मुख्य लढत ही भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातच होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशिवाय इतर पक्षही दखलपात्र जागा मिळवण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

वाचा सविस्तर – अनिल गोटेंचा लेटर बॉम्ब!

अहमदनगरमध्ये छिंदमच्या पूजेचीच चर्चा!

दरम्यान, एकीकडे धुळ्यात गोटेंच्या पारड्यात काय पडणार यावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे अहमदनगरमध्ये माजी महापौर श्रीपाद छिंदमा यांचं नाव दिवसभर चर्चेत होतं. सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वीच छिंदम यांच्या भावाने मतदान केंद्रावर जाऊन केलेली मतदान यंत्राची पूजा अनेकांच्या भुवया उंचावणारी होती. मात्र, त्याव्यतिरिक्त अहमदनगरमध्ये मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पडलं. इथे एकूण ६७ टक्के मतदान झालं. महानगरपालिकेच्या १७ प्रभागांमध्ये एकूण ६८ जागांसाठी रविवारी मतदान झालं. यामध्ये अनुसूचित जातींसाठी ९, अनुसूचित जमातींसाठी १ तर मागासवर्गासाठी १८ जागा राखीव आहेत. इथेही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या ४ प्रमुख पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. जाणकारांच्या मते अहमदनगरमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळता त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या दोन्ही महानगर पालिकांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी सकाळी १० वाजता सुरू होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -