घरमहाराष्ट्रशिवसेनेत अस्वस्थता

शिवसेनेत अस्वस्थता

Subscribe

उद्धव ठाकरेंनी २२ नोव्हेंबर रोजी बोलावली आमदारांची बैठक

राज्यात शिवसेनेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेत २७ दिवसांनंतरही डेडलॉक कायम आहे. शरद पवार-सोनिया गांधी यांची भेट होऊनही शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी या भेटीत चर्चाच झाली नसल्याचे पवारांनी सांगितल्याने शिवसेनेचे आमदार गर्भगळीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या आमदारांना माहिती देण्यासाठी शुक्रवारी मातोश्री येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत आमदारांना शिवसेनेची सरकार स्थापनेची सर्व माहिती दिली जाईल आणि पुढील तीन दिवसांत शिवसेनेच्या मुख्यमंत्री निवडीची सर्व प्रक्रिया पार पडेल असे एका ज्येष्ठ नेत्याने आपलं महानगरला सांगितले.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष अद्याप अंतिम निर्णयापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आता शिवसेनेच्या आमदारांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. सेनेचे आमदार आता खासगीत बोलतांना सेना नेतृत्त्वाकडून होत असलेल्या प्रयत्नांवर शंका उपस्थित करू लागले आहेत. ‘एकवेळ भाजप परवडली पण दोन्ही काँग्रेस नको, शरद पवार यांच्या भूमिकेमुळे आता महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार की नाही याचीच आम्हाला शंका येऊ लागली आहे’, असे मतप्रदर्शन आमदार करू लागले आहेत. त्यात भर म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले. त्यामुळेही सेनेच्या आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली आहे.

- Advertisement -

आमदारांमध्ये अशीच संभ्रमावस्था वाढत राहिली, तर त्याचा फायदा भाजपकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. या भीतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी, सेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत उद्धव ठाकरे हे सेनेच्या आमदारांमध्ये सत्तास्थापनेविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

पाच दिवसांचे कपडे आणा                                                                                               शुक्रवारी मातोश्रीवर बैठकीसाठी येणार्‍या शिवसेनेच्या सर्व आमदारांना येताना पाच दिवस पुरतील इतके कपडे, आधारकार्ड, पॅनकार्डसोबत घेऊन येण्यास सांगितल्याचे सुत्रांकडून कळते. राज्यात सत्तास्थापनेसाठी दिल्लीत हालचाली होत आहेत. येत्या चार-पाच दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यपालांकडे ओळख परेडसाठी आमदारांना जावे लागेल.

- Advertisement -

दिल्लीतील रद्द झालेल्या बैठकीमुळे चिंता
मंगळवारी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची बैठक रद्द झाल्याने शिवसेनेचे आमदार चांगलेच हादरले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील नेते शिवसेनेला एक सांगतात आणि दिल्लीत गेल्यावर शब्द फिरवतात, म्हणून शिवसेनेचे आमदार अस्वस्थ झाले आहेत. याविषयी बोलताना शिवसेनेचे काही ज्येष्ठ नेते खासगीत बोलताना ‘आमदार चिंतेत आहेत, मात्र याचा फायदा घेऊन कुणी आमदार फोडण्याचा प्रयत्न करून नये, याबाबत पक्षश्रेष्ठींकडून खबरदारी घेतली जात आहे’, असे सांगत आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी शरद पवारांशी दिल्लीत दुसर्‍यांदा भेट घेत १० मिनिटे बंद दाराआड चर्चा केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -