घर महाराष्ट्र 'मिंधे' सरकारला चाड उरली आहे काय? ठाकरे गटाचा हल्लाबोल

‘मिंधे’ सरकारला चाड उरली आहे काय? ठाकरे गटाचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : ऐन पावसाळय़ात ओढवलेले दुष्काळाचे संकट, सततची नापिकी आणि डोक्यावरील कर्जाच्या असह्य बोजामुळे मराठवाड्यात रोज कुठे ना कुठे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या यशाचे गोडवे गाणाऱ्या भाटांची तोंडे आपल्याच प्रांतातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर मात्र काहीच बोलत नाहीत. महाराष्ट्रातील ‘मिंध्यां’च्या सरकारला तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची काही चाड उरली आहे काय? राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्रच सुरू झाले आहे, पण शिंदे सरकारमधील एकही मंत्री-संत्री त्यावर बोलायला तयार नाही. एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच मग्न असलेल्या या तीन पायांच्या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी वेळ आहे तरी कुठे? असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांना अनन्यसाधारण शक्तीचे वरदान, त्यांच्या संवर्धनाची गरज- राष्ट्रपती मुर्मू

- Advertisement -

तब्बल 40 दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत खरीप पिकांचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. कोरडवाहू जमिनींवरील कापूस, सोयाबीन, मका इत्यादी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर वाळून गेली. चार दिवसांपूर्वी थोडाफार पाऊस झाला, पण पुन्हा दोन दिवसांपासून कडक ऊन पडू लागले आहे. भरघोस पाऊस पाडणारा ऑगस्ट महिनाही उन्हाळ्यासारखा रखरखीत गेला, त्यामुळे मराठवाडा-विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. हे संकट साधेसुधे नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

विहिरी, तलावांनी पावसाळ्यातच तळ गाठला
सप्टेंबरचा निम्मा महिना संपला आहे. पावसाळ्याचे जेमतेम शेवटचे पंधरा दिवस शिल्लक आहेत. दोन दिवसांच्या शिडकाव्यानंतर पाऊस पुन्हा गायब झाला आहे. गतवर्षी याच महिन्यात राज्यातील सारी धरणे तुडुंब भरली होती. मराठवाडय़ातील जायकवाडीसह अनेक प्रकल्प ओसंडून वाहात होते. यावर्षी मात्र सारी धरणे व लहान-मोठ्या प्रकल्पांतील जलसाठा 40 टक्क्यांच्या खालीच आहे. विहिरी, तलावांनी पावसाळ्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत तग कसा धरायचा आणि शेती, पिके व फळबागा कशा वाचवायच्या, या चिंतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लोकसभेसाठी महायुतीचे सूक्ष्म नियोजन, जागा जिंकण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय समिती स्थापन करणार

आत्महत्यांची उच्चांकी शरमेने मान खाली घालायला लावणारी
ऐन पावसाळय़ात ओढवलेले दुष्काळाचे संकट, सततची नापिकी आणि डोक्यावरील कर्जाच्या असह्य बोजामुळे मराठवाड्यात रोज कुठे ना कुठे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. रविवारी तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे झाले एका दिवसाचे. पण गेल्या आठ महिन्यांत मराठवाड्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी 475 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी मदतीसाठी पात्र ठरवण्यात आल्या आहेत, तर 200हून अधिक शेतकरी कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हे उच्चांकी प्रमाण शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

समाज माध्यमांवर उन्मादाचे वातावरण
एकीकडे देशात जी-20 शिखर परिषदेच्या आयोजनावरून ‘बघा, देश किती पुढे गेला’, असे ढोल बडवले जात आहेत. समाज माध्यमांवर कायम पडून असलेल्या टोळ्या वांझोट्या उन्मादाचे वातावरण निर्माण करत आहेत. जी-20चे आयोजन करून जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे आगतस्वागत केले म्हणजे देशातील सारे प्रश्न जणू काही संपुष्टातच आले आहेत, असे आभासी चित्र निर्माण करण्यात भक्तमंडळींच्या टोळधाडी मश्गुल असतानाच महाराष्ट्रातील व खासकरून मराठवाडा, विदर्भातील पिचलेले शेतकरी मात्र गळफास घेऊन वा विषप्राशन करून आत्महत्या करीत आहेत, अशी कडाडून टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे.

हेही वाचा – विघ्‍नविनाशक गणेशदेवा… लाडक्या बाप्पाच्या आवडत्या मोदकांची 10 दिवस रेलचेल

…पण शेतकऱ्यांना काय मिळणार?
राज्यातील ‘एक फुल, दोन हाफ’ सरकार येत्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात मुक्कामाला येत आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची एक बैठक मराठवाड्यात घ्यायची, हा सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच ही बैठक आहे, असे दिसते. अवघे मंत्रिमंडळ शहरात येणार म्हणून सर्वत्र रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. त्यातच मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचा समारोप करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील 75 मिनिटांच्या दौऱ्यावर येणार असल्याने शहरात रंगसफेदीचे काम जोरात हाती घेण्यात आले आहे. पण दुष्काळाच्या संकटात काळवंडलेल्या मराठवाड्याला व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या वरवरच्या रंगरंगोटीने काय मिळणार आहे? असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी…
दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यावर ओढवलेले दुष्काळाचे भीषण सावट पाहता आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. कमालीचे नैराश्य आणि वैफल्य यामुळे मराठवाड्यातील शेतकरी रोज मृत्यूला कवटाळत असतानाच मिंध्यांचे ‘खोके’ सरकार मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाड्यात येत आहे. जीवन संपवायला निघालेल्या मराठवाड्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या बैठकीतून काही ‘खोकी’ खर्ची पडतील काय? असा बोचरा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -