घरमहाराष्ट्रलोकसभेसाठी महायुतीचे सूक्ष्म नियोजन, जागा जिंकण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय समिती स्थापन करणार

लोकसभेसाठी महायुतीचे सूक्ष्म नियोजन, जागा जिंकण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय समिती स्थापन करणार

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सूक्ष्म नियोजन करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वय समिती गठीत करण्यात येणार आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सूक्ष्म नियोजन करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वय समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून भाजप, शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Micro-planning of MahaYuti for Lok Sabha, Constituency wise coordination committee will be formed to win seats)

हेही वाचा – कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्याची सिंगल लेन वाहतुकीसाठी सुरू

- Advertisement -

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीनेही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आज मंगळवारी (ता. 12 सप्टेंबर) भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशीष शेलार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती पत्रकारांना दिली.

महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वय समिती गठीत केली जाणार आहे. तीनही पक्षासह एनडीएतील इतर घटक पक्षाच्या नेत्यांचा या सर्वसमावेशक समन्वय समितीत समावेश असेल, असे शेलार यांनी सांगितले.

- Advertisement -

आजच्या बैठकीत लोकसभेच्या 48 मतदारसंघांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून 45 च्यावर जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत जे ठरले होते, ते विषय पुढे नेण्यासाठी जे निर्णय करणे अपेक्षित होत त्यावर चर्चा झाली. यासाठी लोकसभा निवडणुकीच्या समन्वयाची जबाबदारी समन्वय समितीबरोबर अन्य नेत्यांवर असेल. शिवाय प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वय करण्यासाठी या तिन्ही पक्षांबरोबर एनडीएतील अन्य घटक पक्षांचा समावेश असलेली समिती नेमण्याचा आज निर्णय झाला. त्यासाठी काही नावाचा विचार झाला. आता यासंदर्भात अंतिम निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते करतील, असे शेलार यांनी सांगितले.

लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभेच्या 288 मतदारसंघात आम्ही घटक पक्षांबरोबर कोअर ग्रुप स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय आज महायुतीच्या बैठकीत झाला. यासंदर्भातील चर्चा पूर्ण झाली आहे. तसेच विधिमंडळातील सदस्यांच्या विधानसभा आणि विधानपरिषद निहाय समित्या गठीत करण्याबाबतही चर्चा झाली असून याबाबतचा निर्णय लवकर घोषित होईल, असे शेलार यांनी सांगितले. एकंदरीत नियमितपणे एकत्रित निर्णय करण्याच्या प्रक्रियेला चांगली गती या बैठकीनंतर मिळाली याचा आम्हाला आनंद आहे, असेही शेलार यांच्याकडून सांगण्यात आले. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रसाद लाड आणि भाजपचे आशिष कुलकर्णी आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -