घरमहाराष्ट्रडॉ. गिरीष गांधी, राजीव खांडेकर यांना पुरस्कार

डॉ. गिरीष गांधी, राजीव खांडेकर यांना पुरस्कार

Subscribe

संगमनेरच्या दंडकारण्य अभियानाचे प्रणेते, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांना, तर डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गिरीष गांधी यांना देण्यात येणार आहे. याशिवाय सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील व त्यांच्या पत्नी योगिता शेरकर यांना जाहीर झाला.

संगमनेर तालुका दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे यांनी सोमवारी या पुरस्कारांची घोषणा केली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

सहकार, साहित्य, समाजसेवा आणि पर्यावरण यात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तीला स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने तर कृषी, शिक्षण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तीला डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने दरवर्षी सन्मानित केले जाते. प्रत्येकी १ लाख १ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्यावतीने हे पुरस्कार देण्यात येतात. याशिवाय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्यावतीने दिला जाणारा सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरुप ५० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे.

भाऊसाहेब थोरात आणि अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या प्रेरणा दिनी १२ जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता मालपाणी लॉन्स येथे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाईल. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, विधानपरिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यावेळी उपस्थित असतील.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -