घरमहाराष्ट्रपुणेMeera Borwankar : अजित पवारांच्या अडचणी वाढणार? मीरा बोरवणकरांचे पत्रकार परिषदेतून थेट...

Meera Borwankar : अजित पवारांच्या अडचणी वाढणार? मीरा बोरवणकरांचे पत्रकार परिषदेतून थेट आरोप

Subscribe

माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांचे नाव न घेता त्यांच्यावर थेट आरोप केले आहेत. 2010 मध्ये अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या सांगण्यावरून येरवडा कारागृहाच्या जागेचा लिलाव करण्यात आला होता आणि त्यावेळी ती जागा मी बिल्डरला हस्तांतरित करण्याला नकार दिला होता, असा दावा मीरा बोरवणकर यांनी केला. ज्यानंतर कालपासून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. याच संदर्भात मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्यावर थेट आरोप केले आहेत. या पुस्तकात मी 38 प्रकरणं लिहिली असून विविध विषयांवर लिखाण केले आहे, परंतु मीडियामध्ये आणि राजकीय वर्तुळात फक्त हाच विषय का उचलून धरण्यात आला आहे, असा प्रश्न यावेळी बोरवणकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. (Ex-IPS officer Meera Borwankar directly accused Ajit Pawar through a press conference)

हेही वाचा – Madam Commissioner : बोरवणकरांच्या पुस्तकातील विभागीय आयुक्त आहेत दिलीप बंड अन् बिल्डर शाहिद बलवा

- Advertisement -

‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. ज्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे स्पष्टीकरण देण्यासाठी मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोरवणकर यांनी खुलासा करत म्हटले आहे की, ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकात 38 प्रकरणे आहेत. येरवड्यातील जमिनीबाबत फक्त एकच प्रकरण आहे. त्यामुळे एकाच प्रकरणापुरते पुस्तकाकडे पाहू नका. या पुस्तकात एकतर्फी प्रेमात तरुणीची झालेली हत्या, जळगाव सेक्स स्कँडल, मानवी तस्करी अशा विविध घटनांबाबत लिहिण्यात आले आहे. त्यामुळे या एकाच प्रकरणाबद्दल मला विचारणा करू नका, असे आवाहन त्यांनी प्रसार माध्यमांसमोर केले आहे. हे पुस्तक प्रशासन, उत्कृष्ट तपास, मुली-महिलांचे शोषण अशा विविध मुद्यांवर आहे. हे पुस्तक सगळ्यांनी विशेषत: मुलींनी, महिलांनी वाचावे, असेही बोरवणकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

अजित पवारांवर थेट आरोप…

अजित पवार यांनी लिलाव केला नाही, हे सत्य आहे. पुणे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीच्या लिलावासाठी सरकारने एक समिती नेमली होती. त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. माझ्याकडे कार्यभार असल्याने ही जमिनीवरील ताबा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. अजित पवारांनीदेखील हाच आग्रह धरला होता. लिलाव झाल्याने आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू करा असे त्यांनी म्हटले. मात्र, माझ्या दृष्टीने ती जागा महत्त्वाची होती. पुणे पोलीस आयुक्तालय, पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी ही जागा वापरता आली असती. त्यामुळे मी त्या तीन एकर जमिनीच्या लिलावाला आक्षेप घेत हस्तांतरणाला विरोध केला, असे मीरा बोरवणकर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

- Advertisement -

परंतु, त्यावेळी अजित पवारांनी मला ती जागा हस्तांतरित करायला सांगितली. ज्यानंतर मी त्यांना त्यासाठी नकार दिला. आर. आर. पाटील यांच्यासमोर ज्यावेळी हे प्रकरण गेले तेव्हा मी त्यांना ती जागा का महत्त्वाची आहे, हे नीट समजावून सांगितले. ज्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलली. पण मॅडम तुम्ही याच्यात पडू नका, असे तेव्हा तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्याकडून सांगण्यात आल्याचेही मीरा बोरवणकर यांच्याकडून सांगण्यात आले.

महत्त्वाची बाब या प्रकरणात ही जमीन लिलावापासून वाचली कारण, ही जमीन शाहिद बलवा याला देण्यात येणार होती. पण नेमके त्यावेळेस 2 जी घोटाळ्यामध्ये शाहिद बालवा याला अटक केल्याने ते महत्त्वाचे ठरले. एका अर्थाने 2 जी घोटाळ्यामुळे आम्हाला ती जमीन वाचवण्यासाठी चांगलेच बळ मिळाले, असेही मीरा बोरवणकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -