घरमहाराष्ट्रकोकणात जाणार्‍या गणेशक्तांचे मेगाहाल

कोकणात जाणार्‍या गणेशक्तांचे मेगाहाल

Subscribe

मुंबई-गोवा, मुंबई-पुणे महामार्गांवर वाहतूक कोंडी

गणेशोत्सवासाठी मुंबईहून मोठ्या उत्साहाने कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचे वाहतूक कोंडीमुळे मेगाहाल झाले आहेत. यंदाही गणेशोत्सवासाठी मुंबईहून गणेशभक्त रेल्वे आणि रस्ते मार्गावरून कोकणात जात आहेत. मात्र रेल्वे गाड्या ५ ते ८ तास उशिराने धावत आहेत, तर मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि त्यातच सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वडपाले गावाजवळ एक एसटी बस जळून खाक झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वााहतूक कोंडी झाली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याकडील मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

शुक्रवारी रात्रीपासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढू लागली. शनिवारी रात्रीपासून त्यात दुप्पट-तिप्पट वाढ झाली. गणेशोत्सवाला जाण्यासाठी चाकरमानी कोकणाकडे निघण्यापूर्वी महामार्गावरील खड्डे भरले जातील,असे बांधकाम मंत्र्यांपासून संबंधित अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र दर्जाहीन महामार्गामुळे चाकरमान्यांच्या वाहनांच्या वेगाला आपोआप ब्रेक लागला. चार-पाच तासांच्या प्रवासाला दुपटीपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने प्रवास नकोसा झाल्याची प्रतिक्रिया चाकरमानी व्यक्त करीत आहेत. रविवारी महाड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुंबई येथून जाणार्‍या वाहनांची येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल ते वाकण या चार किलोमीटर मार्गात दुपारपर्यंत प्रचंड कोंडी झाली होती. कोंडी झाल्याने मुंबईहून कोकणात जाणार्‍या कार, जीपसारख्या छोट्या वाहनांनी शहरातील शिवाजी चौकातून आपली वाहने नेण्याचा प्रयत्न केल्याने तेथेसुद्धा वाहतुकीची कोंडी झाली होती.

- Advertisement -

मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणे मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला. सकाळपासूनच अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कासवगतीने सुरू होती. रविवार असल्याने दिवसभर आणि उद्या सुट्टी असल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर अशीच परिस्थिती राहील, असे द्रुतगती मार्गावरील वाहतूक पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

बर्निंग बसचा थरार
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव ते महाड दरम्यान वडपाले गावाजवळ एसटी बसने पेट घेतल्याने एकच हाहा:कार उडाला. मात्र वाहक व चालकाच्या प्रसांगवधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. सकाळी ७ वाजता या थरारक घटनेनंतर महामार्गावरील दुतर्फा वाहतूक खोळंबून राहिली होती. गणेशोत्सवा निमित्ताने परळ (मुंबई) स्थानकातून ही बस (एमएच २० बीएल 4209) रात्री दहिवडे-चिपळूणकडे निघाली होती. बसने लोणेरे गाव सोडल्यानंतर वडपाले गावाजवळ इंजिनमधून धूर येऊ लागल्याने चालक जगदाळे यांनी बस बाजूला घेऊन पाहणी केली असता इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात आले. त्यांनी व वाहक माळी यांनी 52 प्रवाशांना त्यांच्याकडील सामानासह पटापट बाहेर पडण्यास सांगितले. प्रवासी उतरत नाही तोच बसने पेट घेतला.

- Advertisement -

स्थानिकांसह थोड्याच वेळात दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केलेले असल्याने बस जळून खाक झाली. या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. तब्बल ४ तासांनी येथील वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली. त्यामुळे पेण ते ईरवाडीपर्यंत तर वाकण ते कोलाड आणि इंदापूर ते माणगावपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -