घरमहाराष्ट्रHSC Paper Leak : बारावी बोर्डाच्या केमिस्ट्रीच्या पेपरनंतर आता गणिताचा पेपर फुटला;...

HSC Paper Leak : बारावी बोर्डाच्या केमिस्ट्रीच्या पेपरनंतर आता गणिताचा पेपर फुटला; उत्तरपत्रिका व्हायरल

Subscribe

राज्यातील पेपर फुटीचे प्रकरण थांबण्याचे नाव घेत नाही. बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटीची घटना शनिवारी समोर आली होती. याप्रकरणी मालाडमधून एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. यातच आता बारावीच्या केमिस्ट्रीच्या पेपरनंतर गणित विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमध्ये सकाळी 10 वाजता गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा रंगत आहे. या घटनेनंतर शिक्षणाधिकारी श्रीगोंद्यात दाखल झाले आहेत. मात्र कुठल्या परीक्षा केंद्रावरून हा पेपर फुटला आहे याचा तपास सध्या सुरु आहे. सकाळच्या सुमारास उत्तरपत्रिकेसह पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. अनेकांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केलेय. मात्र या पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना काय फटका बसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काही वेळापूर्वीच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत माहिती देताना सांगितले की, राज्यात कुठेही बारावीचा पेपर फुटला नाही. मात्र सोशल मीडियावर तर गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह व्हायरल झालेला दिसतोय. मुंबईतील साठे कॉलेजमध्ये बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. त्यापोठापाठ आता अहमदनगरमध्ये देखील गणिताच्या पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्याने चिंता व्यक्त होतेय.

- Advertisement -

मुंबईतील पेपर फुटी प्रकरणात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यमातून सुरु आहे. या प्रकरणी एक निवेदनही शिक्षण मंत्र्यांनी विधान परिषदेत सादर केले, मात्र यानंतर पुन्हा बारावीच्या गणित विषयाचा पेपर फुटल्याचे समोर आल्याने त्यावर शिक्षणमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान केमिस्ट्री पेपर फुटी प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाने बारावी केमिस्ट्रीचा पेपर आपल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्सअॅपवर पेपर सुरू होण्याआधीच दिल्याची माहिती समोर आली आहे.


Maharashtra Budget Session 2022 : १२ वी केमिस्ट्रीचा पेपर फुटला नाही, शिक्षणमंत्र्यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -