छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरकारी कार्यालये पडली ओस, कर्मचारी संपाला मोठा प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : जुनी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संघटनांनी आजपासून संपाचे हत्यार उपसले आहे. नामांतर झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच मराठवाड्यातील कर्मचारी संपावर गेल्याने शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालये ओस पडली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना या संपाचा चांगला फटका बसला आहे.


जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांवरील उपकार नसून तो त्यांचा हक्क असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याची माहिती नायब तहसीलदार संघटनेने दिली. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आज सकाळी ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी एकत्र आले होते. या कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीसुद्धा संपाला चांगला प्रतिसाद दिला

संपाचा परीक्षेवर परिणाम नसला तरी उत्तरपत्रिक तपासण्यास शिक्षकांचा नकार
जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि नियुक्ती दिनांकापासून ते आजपर्यंत जे शिक्षक रूजू झालेले आहेत, अशा अनुदानित शिक्षकांना देखील समाविष्ट करू घ्यावे, या मागणीसाठी आज सकाळपासूनच शिक्षकांनी देखील संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आज जिल्ह्यातील जवळपास ७ ते ८ हजार शिक्षक रस्त्यावर उतरले होते. शिक्षकांनी मुख्यध्यापकांना पत्र देऊन एकही काम करणार नाही, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली होती. सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून त्यावर परिणाम होणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षेसाठी शिक्षक उपस्थित राहणार आहेत, मात्र उत्तरपत्रिका तपासणार नाही, असा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांचा संप लवकर संपला नाही तर निकालावर परिणाम होणार का? असाही प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

सरकारी महिला कर्मचाऱ्यांचाही पेन्शनसाठी पुकारण्यात आलेला संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मार्च एंडला महत्त्वाचे अधिकारीही सुट्टीवर
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबरोबर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य महत्त्वाचे अधिकारीही मिटिंग आणि ट्रेनिंग निमित्त सुट्टीवर आहेत. विभागप्रमुख नसल्याने ऐन मार्च एंडच्या काळामध्ये प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रशासकांना मोठ्या अडचणींचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.

सरकारी कर्मचारी संपावर असल्यामुळे कार्यालये ओस पडली होती