घरक्राइमशाळकरी मुलांना गांजा विक्रेत्यांची माहिती; पोलीस यंत्रणा अनभिज्ञ कशी?

शाळकरी मुलांना गांजा विक्रेत्यांची माहिती; पोलीस यंत्रणा अनभिज्ञ कशी?

Subscribe

शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये गांजाची नशा करण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या विद्यार्थ्यांना गांजा विक्रेत्यांची माहिती सहजपणे मिळते परंतु, नाशिक पोलिसांना मात्र ही माहिती मिळत नाही, हे विशेष. त्यामुळे पोलिसांचीही या नशेच्या व्यवसायास मूक संमती आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो.

आई- वडिलांनी गांजाचे व्यसन करू दिले नाही म्हणून नाशिकमधील एका २३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर ‘आपलं महानगर’ने आढावा घेतला असता धक्कादायक वास्तव पुढे आले. शहरातील बहुतांश भागात गांजाची सर्रास विक्री होत आहे. प्रामुख्याने या विक्रेत्यांचा ग्राहक हा शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याचप्रमाणे कामगार वर्गालाही आजकाल सावज केले जात आहे.

- Advertisement -

शहरासह जिल्ह्यात दररोज लाखो रुपयांच्या गांजाची विक्री होते. इतर अंमलीपदार्थांच्या तुलनेत गांजाची सहज उपलब्धता असल्याने तरुणाईला गांजाच्या नशेची चटक लागली आहे. पोलिसांकडून झालेल्या दुर्लक्षामुळे गांजा विक्रेत्यांनी थेट सार्वजनिक ठिकाणीही खुलेआम विक्री सुरू केली आहे. हे विक्रेते पोलिसांच्या हाती लागत नसले तरी शहरातील उद्याने, पुलाखालील परिसर, अमरधाम, मोकळ्या जागा, समाजमंदिरे अशा ठिकाणी गांजा पिणारे तरुण सहजपणे दिसून येतात. महत्वाचे म्हणजे गांजाची नशा करणार्‍यांचा विशिष्ट वास येतो. त्यामुळे असे तरुण हटकणे सहजसोपे आहे. अशा तरुणांच्या चौकशीतून विक्रेत्यांची नावे पोलिसांना मिळणे अवघड नाही. गांजा विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याची मानसिकता असली तर पोलिसांसाठी हे केवळ चार दिवसांचे काम आहे. थेट विक्रेत्यांना ताब्यात घेऊन गांजा पुरवणार्‍या तस्करांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे. तस्करांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यास गांजाविक्री रोखणे शक्य होईल.

पोलिसांनो बघा, या ठिकाणी गंजाडींचे अड्डे

अमरधाम, होळकर पुलाखालील भाग, एकमुखी दत्तमंदिराकडे जाणार्‍या पायर्‍यांच्या उताराला, गांधी तलावाच्या कठड्यांवर, यशवंतराव महाराज पटांगणाशेजारील राणी काशीबाई भोसले यांचे समाधीस्थळ परिसर, रामसेतू पुलाखालील भाग, कपूरथळा, भाजीबाजार पटांगण, टाळकुटेश्वर पुलाखालील भाग, तपोवन, घासबाजार, भद्रकाली, भद्रकाली टॅक्सी स्टॅण्डजवळील वॉटर फिल्टर प्लांट, पंचवटीत पुरिया पार्क गार्डन, बाजार समितीच्या प्रवेशव्दारासमोर,
रामसेतू पुलाखालील परिसर, कुसुमाग्रज उद्यान, कॉलेजरोड, चांदशी, नवश्या गणपती मंदिर परिसर, सोमेश्वर, गोदापार्क, गोविंदनगर, गणपती मंदिरामागील उद्यान, पवननगर, उत्तम नगर, महाकाली चौक, घारापुरे घाट, उत्तम नगर, पवन नगर, मिनी स्टेडियम संभाजी स्टेडियम, शिवाजी चौक, मोरवाडी, आसारामबापू पूल, देवळाली गाव, गांधी पुतळा परिसर, नाशिकरोड रेल्वे स्टेशन, रोकडोबा वाडी, सिन्नर फाटा.

- Advertisement -

अमरधाम बनले गांजा ओढण्याचे केंद्र

अमरधाम परिसरात गांजा ओढणारे मोठ्या प्रमाणात दिसतात. नशा केल्यानंतर हे लोक हैदोस घालतात. रात्रीच्या वेळी पादचार्‍यांसह वाहनचालकांना लुटण्याचेही अनेक प्रकार येथे घडल्याचे सांगितले जाते.

आपलं महानगरशी साधा संपर्क

गांजासह अन्य नशेच्या आहारी जाणार्‍या तरुणांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. नाशिककरांनी आपले अनुभव वा काही गुप्त माहिती असल्यास ती ‘आपलं महानगर’च्या ९०२२५५७३२६ या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर पाठवावी. माहिती पाठविणार्‍यांची नावे गोपनीय ठेवली जातील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -