घरमहाराष्ट्रAyodhya Makeover : शरयू तीरावरी अयोध्या 'गोकर्ण'निर्मित नगरी; रामलल्लाच्या नगरीचा मेकओव्हर करणारे...

Ayodhya Makeover : शरयू तीरावरी अयोध्या ‘गोकर्ण’निर्मित नगरी; रामलल्लाच्या नगरीचा मेकओव्हर करणारे मराठमोळे नितीन गोकर्ण

Subscribe

शंभर वर्षांत झाला नाही असा बदल आपल्या डोळ्यांदेखत पाहता येणे हा अनुभव स्वप्नवत – नितीन रमेश गोकर्ण

मुंबई – अयोध्या नगरीमध्ये स्वप्नवत बदल झाला आहे. या शहराचा कायापालट झाला आहे. 1992 मध्ये सर्वप्रथम अयोध्या पाहिली होती. तेव्हा शरयू नदीच्या पलीकडे गेल्यानंतर सर्व दगड-मातीत बांधलेली घरं होती. गवताची छप्पर असलेली ती कच्ची घरं होती. सिमेंट काँक्रिटची इमारत तर फारच दुर्मीळ. तीस वर्षांपूर्वी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक या शहरात झालेली नव्हती. अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल येईपर्यंत या शहरात कोणताही बदल झालेला नव्हता. गेल्या तीस वर्षांपासून या शहराला पाहात होतो, पण त्यात कोणताच बदल कधी जाणवला नाही. इथली हनुमान गढी, रामजन्मभूमी, बाबरीचा ढाचा होता तेव्हाची अयोध्या पाहिली आहे. रामलल्लाला तंबूत ठेवल्याचाही काळ पाहिला, आणि आता जेव्हा अयोध्येत विविध कामे होत आहेत, भव्य राम मंदिर होत आहे. तेव्हाची अयोध्या आणि आताची ट्रान्सफॉर्मेशन झालेली अयोध्या पाहातो तो वेगळाच अनुभव असल्याचं उत्तर प्रदेश गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव नितीन गोकर्ण यांनी खास मुलाखतीत ‘आपलं महानगर’ला सांगितलं.

- Advertisement -

स्वप्नवत बदलली अयोध्या नगरी
देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशच्या नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि कर विभागाची अतिरिक्त जबाबदारी असलेले नितीन रमेश गोकर्ण यांच्या नेतृत्वात अयोध्या शहरातील विविध विकासकामे झाली. यामध्ये रस्ते, रल्वेस्थानक, विमानतळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अयोध्या राम मंदिर परिसराचा भाग आणि 1500 एकरातील नवीन अयोध्या, असं अयोध्या शहराचं झालेलं परिवर्तन, स्वप्नवत बदलेलली अयोध्या नगरी आणि त्यात नितीन गोकर्ण यांची असलेली भूमिका याबद्दल त्यांना बोलतं केलं ‘आपलं महानगर’ – ‘माय महानगर डॉट कॉम’चे संपादक संजय सावंत यांनी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनात बनले व्हिजन डॉक्यूमेंट

राम जन्मभूमी प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर अयोध्या शहराच्या विकासासाठी गृहनिर्माण आणि नगर विकास  विभागाने व्हिजन डॉक्यूमेंट तयार केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या समोर या व्हिजन डॉक्यूमेंटचे सादरीकरण करण्यात आले, त्यांच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाला सुरुवात झाल्याचं नितीन गोकर्ण यांनी सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या संपूर्ण प्रकल्पावर बारकाईने लक्ष होते. मुख्यमंत्र्यांनी लखनऊ आणि अयोध्येतही अनेकदा कॅबिनेट बैठका घेऊन या कामाबद्दल माहिती घेतली. इथे काय सुरु आहे, याची इत्तंभूत माहिती त्यांना होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांची जोड आणि राजकीय पाठबळाशिवाय एवढा मोठा प्रकल्प उभा करणे अशक्य होते, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात नितीन गोकर्ण यांनी सांगितले.

- Advertisement -

या प्रकल्पांतर्गत अयोध्येतील रस्ते, नदीचा किनारा, रेल्वे स्टेशनचे नुतनीकरण करण्यात आले. भविष्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाला गृहनिर्माण विभागाकडून अतिरिक्त जमीन देण्यात आली, आता तिथे भव्य रेल्वेस्थानक उभे राहिले आहे.
अयोध्येत झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल नितीन गोकर्ण म्हणाले, ‘अयोध्येत एक जुने विमानतळ होते. एकच धावपट्टी तिथे होती, आणि तिही वापरात नव्हती. तिथे आता आंतरराष्ट्रीय पातळीचे विमानतळ बांधण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सध्या पाच ते सहा शहरांमध्ये फ्लाइट्स सुरु झाले आहेत. येत्या काळात त्यांची संख्या वाढणार आहे.’

उत्तर प्रदेश गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव नितीन गोकर्ण कामाची पाहणी करताना

नवीन अयोध्येची गृहनिर्माण विभागाकडून निर्मिती
राज्याच्या गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याकडून एक नवीन अयोध्या वसवण्याचा प्रकल्प सुरु केला असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी दिली. ते म्हणाले, ‘गृहनिर्माण विभागाने एक नवीन अयोध्या निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. जवळपास 1500 एकर परिसरात हा प्रकल्प सुरु आहे. शरयू नदीच्या काठावर हे काम सुरु आहे. यामध्ये स्टेट गेस्ट हाऊस आणि मठांचे बांधकाम होत आहे. यामध्ये मंदिरांसाठीही जागा आरक्षित करण्यात आली आहे.’
अयोध्येमध्ये देशातील सर्व नामांकित हॉटेल्स ग्रुप येत असल्याचे गोकर्ण यांनी सांगितले. यामध्ये ताज, ओबेरॉय यांच्यासह अनेक नामांकित ग्रुपचा समावेश आहे. त्यासोबतच सर्वसामान्यांना परवडेल असे बजेट हॉटेल्सही येत आहेत.

काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीमध्येही नितीन गोकर्ण यांचा सहभाग राहिलेला आहे. तेव्हा ते सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. तो अनुभव गाठीशी असल्यामुळे अयोध्येतील विकास कामांना अधिक गतीने पुढे नेता येत असल्याचे त्यांनी सांगितले. काशीमध्ये गेल्या वर्षी 10 कोटी भाविकांनी भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘काशीमध्ये आता जागा शिल्लक राहिलेली नाही. पायाभूत सुविधांची वेगाने मागणी तिथे होते आहे, तसेच काही आता अयोध्येतही होण्याची शक्यता आहे.’ अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन तिथे आता टेंट सिटी, हॉटेल्स, लॉज यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

26 जानेवारीनंतर अयोध्येत या!
शंभर वर्षात झाले नाही, असा बदल आपल्या आयुष्यात आपल्याला बघायला मिळत आहे. तेव्हा देशभरातील विविध ठिकाणांहून फोन येत आहेत. आम्ही अयोध्येत केव्हा येऊ म्हणून विचारणा होत असल्याचे नितीन गोकर्ण यांनी सांगितले. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरांचे लोकार्पण होणार आहे. भाविकांनी 26 जानेवारीनंतर अयोध्येत यावे, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक भारतीयाने विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांनी एकदा तरी अयोध्येत दर्शनासाठी येण्याची इच्छा आहे. त्यांनी  इथे  येऊन अयोध्येत झालेला अमुलाग्र बदल बघावा, असेही आग्रहाचे निमंत्रण नितीन रमेश गोकर्ण यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून दिले आहे.

नवीन अयोध्या निर्मितीत पुनर्वसनाचे मोठे आव्हान

नवीन अयोध्या निर्मितीच्या काळात स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध होता, त्यांचे समाधान करणे हे मोठे आव्हान होते. कारण विकासकार्यात त्यांचे घर, दूकान आल्यानंतर ते तोडले जाणार, पाडले जाणार याला नागरिकांमधून मोठा विराध झाला. त्याचा मोबदला त्यांना मिळणार होता. पण तो कसा मिळणार, की मधल्यामधे दुसरेच मोबदला लाटणार याबद्दल नागरिकांमध्ये शंका आणि भीतीचे वातावरण होते. मात्र जेव्हा त्यांचे पुनर्वसन आणि मोबदलाही त्यांना योग्य पद्धतीने दिला गेला. त्यांचा विश्वास संपादन करता आला तर त्यानंतर त्यांनाही वाटते की एका मोठ्या कार्यासाठी आपणही योगदान दिले आहे आणि त्याचा योग्य मोबदलाही आपल्याला मिळाला आहे. अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये नागरिकांचा सहभाग आणि पाठिंबा मिळवणे हेच सर्वात मोठे आव्हान असते आणि तो आम्हाला मिळाला.

IPS ते IAS प्रवास  
नितीन रमेश गोकर्ण या मराठमोळ्या अधिकाऱ्याने वयाच्या २१-२२ व्या वर्षीच देशातील सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा यूपीएससीमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्यांची 1987 साली आयपीएस म्हणून निवड झाली आणि उत्तर प्रदेश केडर त्यांना मिळाले. ऐंशीच्या दशकात उत्तर प्रदेशमध्ये तीन वर्षे ते आयपीएस अधिकारी राहिले. आयपीएस अधिकाऱ्याकडे तातडीने न्याय मिळवून देण्याचा अधिकार असतो, याचे त्यांना मोठे आकर्षण राहिले. मात्र आयपीएसमध्ये सीमित संधी असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर नितीन गोकर्ण पुन्हा अभ्यासाला लागले, आणि १९९० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांची निवड झाली.
उत्तर प्रदेश गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव नितीन गोकर्ण नवीन अयोध्येच्या कामकाजाची पाहाणी करताना

‘मराठी माणसाला उत्तर प्रदेशने मनमोकळेपणाने स्वीकारले’
नितीन रमेश गोकर्ण यांची पहिली नियुक्ती शाहजहांपूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. आता ते उत्तर प्रदेशमध्ये नगर विकास विभाग आणि महसूल खात्यात अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळाबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘नितीन गोकर्ण हे नाव ऐकून सुरुवातील लोक विचारायचे तुम्ही कुठले? १०-१५ वर्षानंतर त्यांनाही हे नाव परिचयाचे झाले. लोकांनीही आम्हाला स्वीकारले, गेल्या ३०-३५ वर्षात कधीही वाटले नाही की आम्ही यूपी बाहेरुन आलोय.’
नितीन गोकर्ण यांनाही सुरुवातीला नवीन प्रदेशात आल्याचा अनुभव आला. त्याबद्दल ते म्हणाले, ‘इथल्या लोकांची भाषा, संस्कृती वेगळी हे सुरुवातीला वाटले. बृहद उत्तरप्रदेश असल्यामुळे इथल्या लोकांनी आम्हाला सहज स्वीकारले.’

संपूर्ण उत्तर प्रदेश फिरत असताना इथेही वेगवेगळी संस्कृती जाणवल्याचं अतिरिक्त मुख्य सचिवांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘उत्तर प्रदेशमध्ये सर्वत्र एकच कल्चर आहे, असं बाहेरुन पाहाणाऱ्यांना वाटतं. पण तसं नाही. मी बुंदेलखंडमध्ये राहिलो, पश्चिमी उत्तर प्रदेशात पोस्टिंग होती, अवध, पूर्वांचल, गोरखपूर, वाराणसी आणि पहाडी भागांमध्ये राहिलो. या प्रत्येक ठिकाणची स्थानिक भाषा, संस्कृती ही वेगवगेळी आहे.’

उत्तर प्रदेशातून होणारे स्थलांतर ५-१० वर्षांत थांबणार!

उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात लोक रोजगारासाठी मुंबई, महाराष्ट्रात येतात. यासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नावर नितीन गोकर्ण म्हणाले, ‘उत्तर प्रदेशातील स्थलांतरासाठी दोन-तीन कारणे आहेत. यातील भौगोलिक कारण महत्त्वाचे आहे. हे एक लँडलॉक स्टेट आहे. या राज्याला समुद्र किनारा नाही. त्यामुळे बंदर, इंपोर्ट-एक्सपोर्टचा उद्योग नाही.’
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यांचा वेगाने विकास झाला कारण त्यांच्याकडे निर्यातीची व्यवस्था आधीपासून तयार आहे. निर्यातीला संधी नसल्यामुळे त्याचा दुसरा परिणाम असा झाला की इथे मोठे उद्योग आले नाही, त्यामुळे रोजगार निर्मिती झाली नाही.’
उत्तर प्रदेशातील उद्योग आणि रोजगाराची परिस्थिती आता बदलत असल्याचे सांगताना राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव गोकर्ण म्हणाले, ‘आता परिस्थिती बदल आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट झाली आहे. त्यामध्ये जवळपास ३२ लाख कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. १२ लाख कोटींचे प्रकल्प उभे राहिले आहेत.’ नगर विकास खात्याबद्दल ते म्हणाले, ‘गृहनिर्माण आणि नगर विकास विभाग शंभरहून अधिक इंटिग्रेटेड टाऊनशिप तयार करत आहे. याला मागणी देखील मोठी आहे.’
उत्तर प्रदेशच्या तरुणांची मानसिकता आता बदलत चालली आहे. राज्याबाहेर जाऊन नोकरी करायची आहे. नोकरीसाठी मुंबई, पुणे, सूरत इथे जायचे आहे, ही मानसिकता आता बदलत चालली आहे. उत्तर प्रदेशातील तरुण आता त्याच्या गावाजवळच रोजगार शोधत आहे, आणि त्याला तशी संधीही मिळत आहे. त्यामुळे येत्या पाच-दहा वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमधून होणारं स्थलांतर थांबेल असा विश्वास नितीन गोकर्ण यांनी व्यक्त केला.

 

प्रभू रामाचीच इच्छा, मी फक्त निमित्त
कोणाच्या हातून कोणते काम होईल हे कोणालाच माहित नसते. त्यामुळे मला अयोध्या पुनर्निर्माणाची संधी मिळाली ही प्रभू श्रीराम, काशी विश्वेशराचीच इच्छा असल्याचे मी मानतो, असे सांगत नितीन गोकर्ण यांनी मिळेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच आपल्या हातात असते, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -