घरमहाराष्ट्रराज्यातील कारागृहे कैद्यांनी तुडुंब, क्षमतेपेक्षा जास्त बंदी

राज्यातील कारागृहे कैद्यांनी तुडुंब, क्षमतेपेक्षा जास्त बंदी

Subscribe

राज्यातील कारागृह कैद्यांनी तुडुंब भरले असून कैदी ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. राज्यातील काही मध्यवर्ती व काही जिल्हा कारागृहांत तर दुप्पट कैदी ठेवले जात आहेत.

=विशेष म्हणजे महिला कारागृहांत महिला कैदीसुद्धा क्षमतेपेक्षा अधिक ठेवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात असलेली ६० कारागृहे ही सध्या पूर्णतः भरली असून २४ हजार ७२२ कैदी क्षमता असणाऱ्या कारागृहांमध्ये तब्बल ४१ हजारांपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दोषी कैद्यांपेक्षा न्यायालयात आरोपपत्र दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये कैद्यांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही कैद्यांचे जामीन घेण्यास कोणीही पुढे येत नसल्याने असे अनेक कैदी आहेत, जे आजही या कारागृहात खितपत पडले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील नारायणडोह आणि पालघर येथे कारागृहे बांधण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पालघरमध्ये एक हजार इतकी क्षमता असलेली तर नारायणडोह येथे ५०० कारागृहे बांधण्यात येणार आहेत. तर येरवडा आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहात देखील आणखी तीन हजार कैदी राहतील इतकी कारागृहे बांधण्यात येणार आहे. यासाठीचे नकाशे आणि आराखडे तयार करण्याच्या सूचना पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाला देण्यात आलेल्या आहेत. तर भुसावळ, हिंगोली आणि गोंदिया येथे कारागृहे बांधण्यासाठीची जागा उपलब्ध झाली असून यासाठीचे काम देखील लवकरच सुरू करण्याची माहिती समोर आली आहे.

तसेच, छत्रपती संभाजी नगर येथे हर्सूल मध्यवर्ती कारागृहात ६०० कैद्यांची क्षमता असताना या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक म्हणजेच एक हजारांपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आलेले आहे. या कारागृहात १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या काही आरोपींना देखील ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत. यामध्ये ०९ मध्यवर्ती, ३१ जिल्हास्तरीय, १९ खुली आणि महिलांसाठी विशेष असे एक कारागृह आहे. या कारागृहांची क्षमता २४ हजार ७२२ कैदी ठेवण्या इतकी असली तरी प्रत्यक्षात मात्र या कारागृहांमध्ये क्षमतेच्या बाहेर म्हणजेच ४१ हजार ७५ कैद्यांना बंदी करण्यात आलेले आहे. यात ३९ हजार ५०४ पुरुष कैदी, १ हजार ५५६ महिला कैदी आणि १५ तृतीयपंथी कैदी आहेत.


हेही वाचा – रवीना टंडन आणि एमएम किरवाणी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला पद्मश्री पुरस्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -