घरमहाराष्ट्र"सध्या राज्यात जाहिरातबाजी सुरू", जयंत पाटलांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

“सध्या राज्यात जाहिरातबाजी सुरू”, जयंत पाटलांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

Subscribe

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात बरीचशी मदत करण्यात आली होती, याबाबतची वस्तुस्थिती समोर आल्याचे समाधान आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या जमा करण्यात एकनाथ शिंदे मागील 3 मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांनी विशेष देणग्या आणल्या नसल्यामुळे यावर्षी केवळ 65.88 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती दिली आहे. परंतु, यावरून आता राज्यातील राजकारणात विविध चर्चा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात बरीचशी मदत करण्यात आली होती, याबाबतची वस्तुस्थिती समोर आल्याचे समाधान आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. (Jayant Patil’s criticism of CM Eknath Shinde on the issue of Chief Minister’s Aid Fund)

हेही वाचा – NiteshRane : राज्यात चेहरा वाचणारा नवा ज्योतिषी आलाय; राणेंची रोहित पवारांवर टीका

- Advertisement -

प्रसार माध्यमांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुख्यमंत्री सहायता निधीबाबत समोर आलेल्या माहितीबद्दल विचारणा केली. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, जी आकडेवारी समोर आली आहे ती खरीच असेल, जर ती वस्तुस्थिती असेल तर. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात अनेकांना अनेक मदती झाल्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयाकडून बऱ्याच मदती झाल्या. त्यामुळे त्याबाबतची जी वस्तुस्थिती आहे, ती समोर आली असल्याने याचे आम्हाला समाधान आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडूनही मुख्यमंत्री निधीतून पैसे दिले जातात. शरद पवार यांच्या आधीपासून मुख्यमंत्र्यांनी त्या-त्या काळातील अत्यंत आवश्यक आणि गरजू प्रश्नांना, समस्येला आणि संस्थांना मदत करण्याचे काम पूर्वीपासून केलेले आहे.

तसेच, व्यक्तिगत आरोग्यासाठीच्या मदत या पूर्वीपासून होतात. ही आपली परंपरा आहे. त्याची जाहिरात कधी कोणी केली नव्हती. सध्या त्याची जाहिरात व्हायला लागलेली आहे. आरोग्यासाठी एखाद्याच्या ह्रदयाच्या विकारासाठी मदत झाली तर त्याची जाहिरात पुर्वीचे मुख्यमंत्री करताना आढळले नाही. सध्या त्या मदतीबाबतचे लिखाण केलेले वाचनात येत असते, असा टोला यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या विविध प्रश्नांवर देखील आपले मत व्यक्त केले आहे.

- Advertisement -

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीबाबत बोलताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अमित शाहांना भेटतात, ही चांगली गोष्ट आहे. मला खात्रीय की राज्याच्या हिताचेच प्रश्न अमित शाहांच्यासमोर ते मांडत असतील. राज्यातील ज्वलंत प्रश्न लवकर निकाली काढण्यावर चर्चा केली असेल, तर त्याचे स्वागत करतो. तसेच, ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे त्यांनी त्याबाबत मत व्यक्त करणे चुकीचे नाही. तर राज्यातील प्रश्न कसे सुटणार याचे उत्तर दिले तर ते गुलदस्त्यात ठेवण्याची गरज नाही. छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समाधान असल्याचेही जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तर, मंत्रीमंडळातील काही लोक एक बाजू, तर काहीजण दुसरी बाजू मांडतात. आरक्षणप्रश्नी कुठल्याही मंत्र्यांमध्ये एकमत नाही. मंत्रीच जाहीरपणाने टोकाची भूमिका मांडत असतात. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण आहे की नाही? कुणावरही लगाम नसल्याने सरकार दिशाहीन झाले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला असून सरकार एका दिशेने जाताना लोकांना दिसत नाही. निधी वाटप, आरक्षण आणि विकासकामांवरून सरकारमध्ये मतभेद आहेत. काळजी करण्यासारख्या या गोष्टी आहेत. महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न मागे राहिले आहेत, असे त्यांच्याकडून यावेळी प्रसार माध्यमांसमोर सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -