घरमहाराष्ट्रSanjay Raut : जुमला आणि नरेंद्र मोदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू,...

Sanjay Raut : जुमला आणि नरेंद्र मोदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू, राऊतांची खोचक टीका

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून राऊतांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.

मुंबई : जुमला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 2014 पासून हे जुमलेबाज नाणे चालवले जात आहे, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून राऊतांनी ही टीका केली. आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. त्यामुळे या आंदोलनात महाराष्ट्राला कशा प्रकारे योगदान देता येईल, याचाही विचार करत असल्याची माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली. आज (ता. 16 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलताना राऊतांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले. (Jumla and Narendra Modi are two sides of the same coin, Sanjay Raut scathing criticism)

हेही वाचा… Farmers protest : मोदी ‘मंदिर मंदिर’ घंटा वाजवत फिरत आहेत, पण…; ठाकरे गटाचे टीकास्त्र

- Advertisement -

आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर सरकारकडून ज्या पद्धतीने थांबविण्यात येत आहे, ते चुकीचे आहे. स्वतंत्र भारतात शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय आहे. देशाच्या राजधानीकडे येण्यासाठी हजारो शेतकरी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागांमधून निघाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकणे, भिंती उभ्या करणे, अडथळे निर्माण करणे, सशस्त्र पोलीस तैनात करणे हे स्वतंत्र हिंदुस्थानात लोकशाहीने निवडून दिलेल्या सरकारला शोभत नाही. ज्या शेतकऱ्यांनी सरकारला निवडून दिले आहे, त्यांच्यावर होणारा अन्याय सरकारला न शोभणारा आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.

तर, 2014 पासून सातत्याने मोदी शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे म्हणून मागणी करत होते. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अहवाल बनवला, त्यात शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, म्हणून शिफारस करण्यात आली. तुम्ही शेतकऱ्यांचे इनकम डबल करणार होता. ज्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू अशी मोदींची भूमिका होती. त्या स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला, पण त्यांच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत, हे ढोंग आहे. त्यामुळे जुमला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 2014 पासून हे जुमलेबाज नाणे चालवले जात आहे. पण आता लोक त्यांना त्रासले आहेत. ज्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हा जुमला चालणार नाही, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, असे राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

- Advertisement -

यावेळी संजय राऊत भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाबाबत म्हणाले की, अशोक चव्हाण सोडून गेले. अशोक चव्हाणांच्या कुटुंबाचे आयुष्य काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसने त्यांना सगळं दिलं. ते सोडून गेले. तत्वांवर बोलणे अशोक चव्हाण यांना शोभा देत नाही. या परिस्थितीत लढणारे लोक तत्त्वांवर बोलू शकतात. अशोक चव्हाण तत्त्वांबद्दल बोलले, तर लोक त्यांच्यावर हसतील, असा टोला राऊतांनी लगावला. “इंडिया आघाडी बनली होती, त्या तत्त्वांनुसार काम करत नाही,” अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली होती, त्यांच्या या टीकेला आता राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -