घरक्राइमलाचखोर बहिरमचे 'वर्क फ्रॉम होम'; मलईदार फाईलींचा घरातूनच व्हायचा निपटारा

लाचखोर बहिरमचे ‘वर्क फ्रॉम होम’; मलईदार फाईलींचा घरातूनच व्हायचा निपटारा

Subscribe

नाशिक : लाचखोर तहसीलदार नरेशकुमार बहिरम याला 15 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर बहिरमच्या बेकायदेशीर कारभाराचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. तहसील कार्यालयात जमिनींच्या न्यायनिवाड्यासाठी येणार्‍या मलईदार फाईल तहसीलदार बहिरम हा घरी घेवून जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या फाईल्सच्या माध्यमातून सेटलमेंट करुन बहिरमने मोठी माया जमविल्याचे बोलले जाते. अनेक प्रकरणांमध्ये सदोष न्यायनिवाड्यांमध्ये बहिरम याची कारकीर्द वादात सापडली आहे. त्यामुळे दप्तर तपासणीतून आणखी वादग्रस्त फाईलसमोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान बहिरमवरील कारवाईनंतर अनेक तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत.

राजूर बहुला येथील जमीनमालकाला मुरुम उत्खननाबाबत पाचपट दंड व स्वामित्वधनाचा दंड कमी करण्याच्या बहाण्याने बहिरम याने तक्रारदाराकडे 15 लाख रुपयांची मागणी केली होती. यासाठी कुणालाही मध्यस्थी ठेवू नको, असेही त्याने तक्रारदाराला सांगितल्याचे समजते. लाच घेताना बहिरमला पकडण्यात आले. अँटी करप्शन विभागाचे अधिकारी समोर दिसताच बहिरम पैसे फेकून पळत सुटल्याचेही सांगितले जाते. मात्र, एसीबीच्या अधिकार्‍याने त्याला चपळाईने पकडले. बहिरमला अटक झाल्यानंतर त्याच्या वादग्रस्त कारभाराचे अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. बहिरमाच्या कामकाजाच्या पद्धतींबाबत मिळालेल्या माहितीनुसार महत्वाचे महसूली न्यायनिवाड्यांचे निर्णय बहिरम थेट घरातून घेत असल्याचेही सांगितले जाते. या माध्यमातून त्याने मोठी माया जमविल्याचे समजते. यापूर्वी बहिरम येवला आणि त्र्यंबक तालुक्याचा तहसीलदार असतानाही त्याने अनेक फाईल्सचा निपटारा घरातूनच केल्याचे समजते. या माध्यमातून कुटुंबाच्या नावे त्याने मालमत्ता खरेदी केल्याचेही समजते.

- Advertisement -

महसूल अधिकार्‍यांना अर्धन्यायिक अधिकार असल्यामुळे न्यायदानाच्या अनेक प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने महसूल अधिकार्‍यांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वीदेखील तात्कालीन अपर जिल्हाधिकार्‍याच्या घरी महसूली दाव्यांच्या फाईल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. बहिरम याच्या कामाची पद्धतदेखील अशीच होती. त्यामुळे आता दप्तर तपासणीतून आणखी काय समोर येते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -