घरताज्या घडामोडीLata Mangeshkar : लतादीदींचा शेवटचा प्रवास, अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी

Lata Mangeshkar : लतादीदींचा शेवटचा प्रवास, अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी

Subscribe

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्यांनी ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

प्रभुकुंज निवास स्थानावरून त्यांचं पार्थिव मोठ्या ट्रकमधून शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना झालं आहे. लतादीदींच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली असून त्यांचं पार्थिव दक्षिण मुंबईच्या पेड रोडवरून, हाजीअली, वरळी नाका, पोद्दार हॉस्पिटल, जुने पासपोर्ट ऑफिस, सिद्धिविनायक मंदिर, कॅडल रोड या मार्गावरून शिवाजी पार्कमध्ये दाखल झालं आहे.

- Advertisement -

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. तसेच मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनीही चोख व्यवस्था केली आहे. त्यांच्या पार्थिवाच्या पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूंना पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. लतादीदींच्या पार्थिवासोबत मंगेशकर कुटुंबीय उपस्थित आहेत. आशा भोसले, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आणि बैजनाथ मंगेशकर हे दीदींच्या पार्थिवासोबत उपस्थित आहेत. अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली असून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. तसेच लतादीदी अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा लोकांकडून केल्या जात आहेत.

देशातील अनेक क्षेत्रातील व्यक्तींची हजेरी लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये इंडस्ट्री, बॉलिवुड, राजकीय क्षेत्र तसेच अनेक चाहत्यांकडून या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत.

- Advertisement -

शिवाजी पार्कवर अनेक दिग्गज उपस्थित 

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी, अर्जुन तेंडुलकर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संगीतकार जावेद अख्तर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भाई जगताप, बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विनोड तावडे, आणि इतर राजकीय, बॉलिवूड इंडस्ट्रीमधून अनेक दिग्गज उपस्थित आहेत.


हेही वाचा : Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनाने राज्यात एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर, अधिसूचना जारी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -