घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : माढा लोकसभेसाठी शरद पवारांची खेळी, धैर्यशील मोहिते पाटलांना...

Lok Sabha 2024 : माढा लोकसभेसाठी शरद पवारांची खेळी, धैर्यशील मोहिते पाटलांना देणार उमेदवारी?

Subscribe

माढा लोकसभेतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले धैर्यशील पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा : महायुतीकडून भाजपातर्फे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना माढा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. पण यामुळे भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे आता माढा लोकसभेतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले धैर्यशील पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार देखील माढा लोकसभेसाठी मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असून त्यांच्या उपस्थितीतच सोलापुरात हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024 Dhairyashil Mohite-patil will join Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar for Madha constituency)

मोहिते पाटील कुटुंबियांनी आज (ता. 10 एप्रिल) आज सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली असून हा पक्षप्रवेश नेमका कधी करण्यात येईल, याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अकलूजमधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे 13 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होईल आणि या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित राहतील, असेही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election : लोकसभेत जागा नाही निदान…; रामदास आठवलेंची भाजपाकडे नवी मागणी

भाजपाचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना महायुतीकडून पुन्हा उमदेवारी जाहीर झाल्याने माढा लोकसभेत महायुतीमधील मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील निंबाळकर यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यामुळे मोहिते पाटलांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवावी, असा आग्रह केला. कार्यकर्त्यांनीच आग्रह केल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील याबाबत विचार करून शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांनी देखील वेट अँन्ड वॉचची भूमिका घेत या जागेवरून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या मोहिते पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर या दोन मातब्बर घराण्याला गळाला लावण्याचे काम शरद पवारांकडून करण्यात आले आहे. शरद पवारही त्यामुळे आता माढा लोकसभेत मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. या जागावाटपात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादीकडून नऊ जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले असून माढा लोकसभेविषयी अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता शनिवारी, 13 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाल्यास त्याचवेळी शरद पवारांकडून त्यांच्या नावाची माढा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून घोषणा करण्यात येईल, अशी माहिती देण्यात येत आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024: नकुल नाथ हे पहिल्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार; कोणत्या पक्षाने दिले तिकीट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -