घरमहाराष्ट्रतुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही!

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही!

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, युक्रेनने नाटोऐवजी मुख्यमंत्र्यांची मदत मागावी

तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र किंवा मराठी नाही. हा समज काढून टाका. त्यामुळे तुमच्यावर केलेला आरोप हा महाराष्ट्रावर आरोप होत नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावले. तुमच्या घरगड्यांना ईडीने चौकशीला बोलाविले म्हणून तुम्ही ईडीला घरगडी म्हणता का , असा जोरदार पलटवारही त्यांनी केला.

विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. या उत्तराला प्रत्युत्तर देताना अंतिम आठवडा प्रस्तावातील एकही मुद्याला उत्तर देण्यात आले नसल्याचा निषेध करत भाजपने सभात्याग केला. तत्पूर्वी फडणवीस यांनी आक्रमक होऊन ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

फडणवीस म्हणाले की, मी जे विषय मांडले, त्यापैकी एकाही बाबतीत मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. मूळ मुद्दे सोडून त्यांनी अवांतर भाषण केले. हे भाषण सभागृहातील आहे की शिवाजी पार्कवरील असा प्रश्न आपल्याला पडला आहे. रशियासोबतच्या युद्धात युक्रेनने आता नाटोऐवजी आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली पाहिजे. त्यांच्याकडे ’टोमणे बॉम्ब’सारखे सर्वांत शक्तिशाली शस्त्र आहे. त्याचा वापर ते करतील. सभागृहात त्यांनी टोमणे मारण्यापलीकडे कोणत्याही आरोपांना आणि मुद्यांवर उत्तरे दिली नाहीत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

नवाब मलिक यांचे समर्थन उद्धव ठाकरे करीत आहेत हे पाहून मला मनातून दुःख झाले. ज्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींसोबत आणि दाऊदच्या हस्तकांसोबत व्यवहार केले त्यांचे समर्थन उद्धव ठाकरे करीत आहेत हे पटणारे नाही. आम्ही मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेत गेलो, मात्र जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होऊ शकतात हे दाखवून दिल्यानंतर सत्तेला लाथ मारून बाहेर पडलो. आज याकूबला फाशी देऊ नका म्हणणारे तुमचेच मंत्री आहेत. आज तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात हे विसरू नका, अशी टीका फडणवीस यांनी केली.

- Advertisement -

आम्हाला शिखंडी म्हणता का? आमच्यात कोणी शिखंडी नाही. पांडवांनी नाही तर कौरवांनी कपटाने राज्य घेतले होते. तसे तुम्ही कपटाने राज्य घेतले. हे कपट करणारा शकुनी कोण होता ते सांगा, असा हल्ला फडणवीस यांनी चढविला. आमचे प्रवक्ते कोणावर कारवाई होणार हे आधी सांगतात असे म्हणता, तर ही अक्कल संजय राऊत यांनादेखील शिकवा. तेसुद्धा बाप- बेटे तुरुंगात जाणार, यांच्यावर कारवाई होणार हे सांगत आहेत. त्यांची भाषाही तुम्ही पाहा, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला.

शिवसेना सत्तेसाठी लाचार
दरम्यान, दाऊदच्या सोबत काम करणार्‍यांच्या विरोधात तरी शिवसेना आमच्यासोबत असेल अशी वेडी आशा आम्हाला होती, मात्र तेच त्यांना आता जवळचे वाटायला लागले आहेत ही शोकांतिका आहे. शिवसेना सत्तेसाठी किती लाचार आहे हे यातून दिसून आले आहे. उलट पोलिसांचा दुरूपयोग करून भाजपच्याच नेत्यांवर कारवाया करण्यात येत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या या अहंकारी वृत्तीचा मुकाबला करण्यास आम्ही तयार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. अधिवेशनात सर्वसामान्य जनता, शेतकरी, गोरगरीब यांच्या हिताचा एकही निर्णय घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भ्रष्टाचार्‍यांनाच पाठीशी घालताना या अधिवेशनात दिसल्याची टीकाही त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -