घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : कॅबिनेटमध्ये गँगवॉर; राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणे म्हणतात...

Maharashtra Politics : कॅबिनेटमध्ये गँगवॉर; राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणे म्हणतात…

Subscribe

सिंधुदुर्ग : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच्या आश्वासनानंतर दुसऱ्यांदा उपोषण मागे घेतले आहे. मात्र राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये मराठा आरक्षणावरून शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी म्हटले की, ओबीसी विरुद्ध मराठा मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू असल्याचे म्हटले होते. यानंतर शिंदे गटाकडून संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले असून आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Politics Gangwar in Cabinet Nitesh Rane says Sanjay Raut statement)

नितेश राणे म्हणाले की, कॅबिनेटमध्ये काय चाललं आहे हे, बघण्यासाठी संजय राऊत चहा द्यायला तिथे गेले होते की, बुट पुसण्यासाठी गेले होते. मंत्रिमंडळ बैठकीत कुठल्याही पद्धतीचा गँगवॉर झालेला नाही. मी हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य ऐकलं आहे. त्यांनी सांगितलं की, असं काही घडलं असेल तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत. माझ्या माहितीनुसार सर्व काही आलबेल होतं. मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस सर्व मंत्र्यांशी बोलले आणि तो विषय संपवून टाकला आहे. त्यामुळे उगाच आग लावण्याचं काम करू नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – फडणवीसांपेक्षा आदित्य ठाकरेंमध्ये जास्त ‘टॅलेंट’; व्हायरल व्हिडीओ प्रकरणी राणेंचा राऊतांना टोला

शंभुराज देसाई काय म्हणाले?

संजय राऊतांना कोण काय सांगतं मला माहीत नाही. पण त्यांचे खबरी राऊतांना कधी तरी अडचणीत आणतील. मंत्रिमंडळामध्ये गँगवॉर हा हास्यापद शब्द संजय राऊतांसारखा चार टर्म असणारा खासदार असणारा व्यक्ती बोलतो, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री जबाबदार आहेत आणि निश्चितच अशाप्रकारचं काही घडलं नाही. संजय राऊत यांना सवय आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. त्यामुळे त्यांना मनाला वाटेल ते बोलत असतात. त्यांच्याकडे आम्ही कोणी गांभीर्याने बघत नाही. त्यांना तेवढ्यासाठी नेमलेलं आहे. ते त्यांचे काम चोख बजावत आहेत, असा टोलाही शंभुराज देसाई यांनी लगावला. त्यांनी असेही म्हटले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही होतो. जर आमच्या गँगवॉर घडला असतं तर आम्ही बाहेर आल्यावर तुम्हाला समजलं असतं. एकमेकांच्या हातात हात घालून खेळीमेळीने आम्ही बाहेर आलो. आमच्यात चर्चा खेळीमेळीने झाली. असं काही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडलं असं जाणूनबुजून भासवलं जात आहे. ज्यांना दुसरं काही काम नाही, ज्यांना विकासाचं व्हिजन, ज्यांना राज्याला काही विचार द्यायचे नाही, केवळ अशा टीका करायच्या, अफवा उठवायच्या एवढं एकच काम संजय राऊत यांना आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही, असे शंभुराज देसाई म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांसाठी सर्वपक्षीय ऑर्केस्ट्रा ठेवू; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर राऊतांची प्रतिक्रिया

संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान, सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यामध्ये सध्या मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद सुरू आहे. राज्याला जातीपातीमध्ये फोडण्याचा जो प्रयत्न आहे, तो सफल होताना दिसत आहे. कारण राज्यामध्ये कमजोर आणि अस्थिर सरकार बसलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणी जुमानत नाही. भाजपा देखील मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही. ओबीसी विरुद्ध मराठा या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू आहे, असा आरोप करताना संजय राऊत म्हणाले की, एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्यापर्यंत परिस्थिती कॅबिनेटमध्ये निर्माण झाली आहे. या राज्यामध्ये अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवू शकत नसतील तर मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून त्यांना बसण्याचा अधिकार नाही. शंभूराजे देसाई काही बोलतात, तर छगन भुजबळ दुसरच काहीतरी बोलतात. मात्र एकनाथ शिंदे या मुद्द्यावर मौन बाळगून आहे, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -