घरदेश-विदेशManohar Joshi : स्पष्टवक्तेपणा आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती ही ओळख -...

Manohar Joshi : स्पष्टवक्तेपणा आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती ही ओळख – शरद पवार

Subscribe

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टवक्तेपणा आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या गुणांमुळे राजकीय वर्तुळात त्यांची एक ओळख होती, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज, शुक्रवारी निधन झाले आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याबद्दल शोकसंवेदना व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती, असे ते म्हणाले.

- Advertisement -

मार्मिक भाषण ही खासियत – सुप्रिया सुळे

माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांनी विविध पदांवर काम केले. अगदी नगरसेवक पदापासून लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. नर्मविनोदी परंतु मार्मिक भाषण ही त्यांची खासियत होती. बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिलेदार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व महाराष्ट्राने गमावले – वडेट्टीवार

मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. एक सामान्य राजकीय कार्यकर्ता ते मुंबई महापालिकेत नगरसेवक, महापौर, विरोधी पक्षनेता आणि पुढे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला हा प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे. आज त्यांच्या निधनाने अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व महाराष्ट्राने गमावले असल्याचे सांगत त्यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू – जितेंद्र आव्हाड

बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ओळख होती. ही ओळख त्यांनी आयुष्यभर जपली. राजकीय वर्तुळात त्यांना जोशी सर या नावाने ओळखले जायचे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -